महापुरात आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचा कोरोना संकटात जगण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:32+5:302021-05-18T04:36:32+5:30

वैनगंगा नदीला गतवर्षी महापूर आला होता. भंडारा तालुक्यातील जमनी येथे रूपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि त्यांची पत्नी रत्नमाला रूपचंद ...

Five siblings who lost their parents in the floods struggle to survive in the Corona crisis | महापुरात आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचा कोरोना संकटात जगण्यासाठी संघर्ष

महापुरात आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचा कोरोना संकटात जगण्यासाठी संघर्ष

Next

वैनगंगा नदीला गतवर्षी महापूर आला होता. भंडारा तालुक्यातील जमनी येथे रूपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि त्यांची पत्नी रत्नमाला रूपचंद कांबळे (४५) या दोघांचा घरात शिरलेल्या पाण्याने बुडून मृत्यू झाला होता. २९ ऑगस्ट २०२० रोजी ही घटना घडली. या दोघांच्या मृत्यूने दुर्गा रूपचंद कांबळे (१७), सोनू (१४), मोनल (११), अमित (९), संयोगी (६) ही बालके निराधार झाली. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी लाखनी तालुक्यातील सिपेवाडाला आधार घेतला. गावातील मंडळींनी लोकवर्गणी करून त्यांना तांदूळ, किराणा, गहू घेऊन दिले. काही समाजसेवकांनीही मदत केली. कोरोना संकटात ही भावंडे याच लोकवर्गणीवर चरितार्थ चालवीत आहेत. अशातच प्रशासनाने मृत्युमुखी पडलेल्या कांबळे दाम्पत्यांच्या वारसांना ८ लाख रुपयांची मदत मंजूर केली. ही सर्व रक्कम लाखनी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आली. प्रत्येक भावंडाच्या नावावर ही रक्कम समान भागात विभागून सामायिक खात्यात ठेवण्यात आली.

१२ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी ही रक्कम ठेवण्यात आली असून त्यावरील व्याज काढून या पाच भावंडांना देण्याचे ठरविले होते. बँकेतून पैसे काढण्यासाठी कांबळे दाम्पत्याची मोठी मुलगी दुर्गा हिच्या स्वाक्षरीसोबतच उपविभागीय अधिकारी आणि भंडारा तहसीलदार यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. आता या घटनेला आठ महिने झाले आहेत. बँकेत जवळपास २३ हजार रुपये व्याजाचे जमा झाले आहेत. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दुर्गा भंडारा येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी सोमवारी आली. मात्र, कोरोना संकटाचे कारण पुढे करीत त्यांना ३१ मेनंतर येण्याचा सल्ला दिला. हे चिमुकले भावंडं लहान तोंड करून गावी परतले.

एकीकडे प्रशासन कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. दुसरीकडे आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचे हक्काचे पैसे देण्यासाठी मात्र कोरोना संकटाचे नाव पुढे करीत आहेत. आठ महिन्यांपासून दुसऱ्यांच्या दानावर ही चिमुकले आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, आपले हक्काचे पैसे मिळाले तर सन्मानाने जगता येईल, असे दुर्गा कांबळे डोळ्यात पाणी आणून सांगत होती. लाखनी तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील कहालकर म्हणाले, कोरोना संकटात तरी या भावंडांना मदत करण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक आणि सुनील या भावंडांना वेळोवेळी मदत करीत असून त्यांच्यासोबत प्रशासनाचे उंबरठेही झिजवीत आहेत.

बाॅक्स

ना रेशन कार्ड ना निराधारची मदत

आई-वडील गमावलेले पाच भावंडे एका झोपडीवजा घरात सिपेवाडा येथे राहतात. दुर्गा ही सर्व भावंडांत मोठी असल्याने तिचा सर्वांना आधार आहे. गावकरी ही या भावंडांच्या मदतीसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करतात. या कुटुंबांना अंत्योदयचे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु अद्यापही ना रेशन कार्ड, ना निराधारची मदत त्यांना मिळाली.

Web Title: Five siblings who lost their parents in the floods struggle to survive in the Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.