तुमसर : दुचाकीच्या डिक्कीतून ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने पळविलेले चोरटे घटनेच्या पाच दिवसानंतरही मोकाटच आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४० ते ४५ जणांची विचारपूस केली आहे. राज्यात अशा चोरीच्या घटना ज्याठिकाणी घडलेल्या आहेत, त्याच्याशी काही तार जुळलेली तर नाही ना? या दिशेने तुमसर पोलीस तपास करीत आहेत.येथील मंगलमूर्ती ज्वेलर्सचे मालक विवेक सोनी हे बुधवारी सकाळी घरुन दुचाकीने दुकानात आले. दुकानासमोर दुचाकी उभी करुन दुकानाचे शटर उघडायला गेले. तितक्यात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्याची बॅग पळविली. या घटनेला पाच दिवस लोटले असून दिवसाढवळ्या या चोरीमुळे शहरात पोलिसांप्रति असंतोष पसरला आहे. या चोरीच्या घटनेसंदर्भात तुमसर पोलिसांनी काही लोकांकडून केलेल्या चौकशीतून काही निष्पन्न निघाले नाही. राज्यात अशी चोरी कुठे झाली होती काय? याचा शोध घेऊन या सराईत चोरट्यांचा कोणत्या टोळीशी संबंध आहे, या दिशेने तपास सुरू आहे.दुकानातून सोने घरी नेणे व पुन्हा दुसऱ्या दिवशी परत दुकानात आणणे धोकादायक आहे. अशा सूचना सराफा व्यावसायिकांना दिल्या होत्या, परंतु सराफा व्यावसायिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. दुकानातून चोरी गेलेल्या सोन्याचा विमा दुकानदाराला मिळतो. रस्त्यातून चोरी गेलेल्या सोन्याचा विमा मिळत नाही. त्यामुळे सराफा व्यावसायिकांनी सोने ने-आण करताना सतर्क राहण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच दिवसानंतरही चोरटे मोकाटच
By admin | Updated: April 12, 2015 01:04 IST