घनकचरा भस्मसात : अग्निशमन वाहन ठरले नावापुरतेचपवनी : नगर परिषदेच्या मालकीचे खापरी रोडवरील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील घनकचऱ्यास आग लागून साठवून ठेवलेला गावातील घनकचरा भस्मसात झाला. सकाळची वेळ असल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. त्यामुळे नुकसान टळले.खापरी रोडवर तालुका क्रीडा संकुलाचे बाजूला नगर पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा साधारणत: ५ एकर जागेत इमारत व मोकळी जागा असा पसारा आहे. २ एकर जागेत गावातील केरकचरा नेवून साठविला जातो व त्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून ही प्रक्रीया बंद असल्याचे समजते. त्यामुळे साठवून ठेवलेल्या कचऱ्यास आग लागली की लावण्यात आली हे समजण्यास मार्ग नाही. त्याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांने वेळीच सुचना दिल्यामुळे पूर्णा दुग्ध उत्पादक कंपनीचा टँकर व नगरपालिकेची पाणी टॅकर याद्वारे आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले. नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन यावेळी देखील कामात येऊ शकले नाही.पवनीत यापूर्वी दोन घरे व एक तणसीचा ढिग जळून मोठे नुकसान झाले. त्यावेळी न.प. चे अग्निशामन वाहन चालकाअभावी निरुपयोगी ठरले. यावेळी न.प. च्या मालकीच्या डम्पिंग यार्डवर आग लागली तरीही अग्निशमन वाहनाचा उपयोग होवू शकला नाही. पुन्हा किती काळ न.प. ला प्रशिक्षित वाहन चालक मिळणार नाही अशी चर्चा होवू लागली आहे. घटनास्थळी नगर परिषद अध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, गटनेते नगरसेवक धमेंद्र नंदरधने, नगरसेवक तुलशी वंजारी, मकसुद खान, पालिकेचे सर्वेअर धनराज पाटील यांनी भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)
पालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये आग
By admin | Updated: June 6, 2016 00:29 IST