जिल्हास्तरीय युवा संमेलन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : युवकांनी जीवनात उच्च ध्येय ठेवून कठोर परिश्रम व सातत्य ठेवण्याची गरज आहे. यश निश्चित मिळू शकेल. आपण ध्येय निवडतांना त्यात प्रामाणिकपणा असावा. युवकांना स्वत:चे निर्णय स्वत: घेता आले पाहिजे. तुमच्या प्रत्येकात भरपूर उर्जा व बौध्दिक क्षमता आहे. त्याला कठोर मेहनतीची साथ दिल्यास जीवनात यशाचे शिखर गाठता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, जे. एम. पटेल महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा संमेलनात जिल्हाधिकारी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे तर अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक विनीता साहू, व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षक मिलींद पत्रे, युवा समन्वयक संजय माटे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र शाह उपस्थित होते. पोलिस अधीक्षक साहू म्हणाल्या, जिद्द व चिकाटीने आपले ध्येय प्राप्त होऊ शकते. त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. मी करु शकेल का ? हे म्हणण्यापेक्षा मी करु शकतो? हा दृष्टीकोण जीवनात सतत ठेवला पाहिजे. तुम्ही सुध्दा समाजात बदल घडवू शकता असा आत्मविश्वास युवकांनी जागृत ठेवला पाहिजे. असेही त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ. ढोमणे म्हणाले, युवकांनी उच्च ध्येय ठेवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशिल असले पाहिजे. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घेऊन आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मिलींद पत्रे यांनी व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंचा आराखडा विद्यार्थ्यांसमोर ठेवला. आपले ध्येय निश्चित ठेवण्यापासून तर ते प्राप्त करण्यापर्यंत असलेल्या आवश्यक गोष्टी युवकांसमोर मांडल्या. तसेच सकारात्मक मानसिकता कशी वृध्दींगत करावी याबद्दल सखोल विवेचन केले. १५ मिनीटे संगीतमय ध्यान घेऊन उपस्थितांना एक अनोखा शांतीपूर्ण अनुभव प्राप्त करुन दिला. प्रारंभी संजय माटे यांनी २०१४-१५ वषार्साठी उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहिर केला. हा पुरस्कार साकोली तालुक्यातील नेहरु युवा मंडळ सोनपुरी यांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ४२ हजार रुपयांचा धनादेश या स्वरुपात प्रदान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते क्रिडा साहित्यांचे वाटप युवा मंडळांना करण्यात आले. प्रास्ताविक संजय माटे यांनी तर संचालन गणेश खडसे यांनी केले. आभार डॉ. राजेंद्र शाह यांनी मानले. कार्यक्रमासाठी रमेश अहिरकर, निकिता बोरकर, राहूल बांते, रक्षा सुखदेवे, ज्ञानेश बन्सोड, ऋषीकुमार सुपारे, मंगेश राऊत, मंजु भोयर, यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
कठोर मेहनतीने यशाचे शिखर गाठा
By admin | Updated: March 10, 2016 00:56 IST