राज्य सरकारची वर्षपूर्ती : ९९४ शेतकऱ्यांना मिळाला लाभ, १.५४ कोटी रूपयांचे कर्ज माफभंडारा : मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने हातात आलेले पिक गेले. सावकाराचे आठ हजार रूपयांचे कर्जही फेडता आले नाही. यंदा पुन्हा सावकाराचे कर्ज काढून धान लागवड केली. पण किडीने अख्खे पीक खावून टाकले. याही दिवाळीला गोडधोड करता येणार नाही, अशी भीती वाटत असतानाच सावकाराकडे गहाण टाकलेले मंगळसुत्र परत मिळालय. त्यामुळे पीक गेले तरी सावकारी कर्जाचे जोखड उतरल्यामुळे आमच्यासाठी आजच दिवाळी साजरी झाली अशी प्रतिक्रिया दामोदर चोपकर या शेतकऱ्याने व्यक्त केली. भंडारा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सिल्ली गावातील दामोदर चोपकर यांची हंसापूर गावात २ एकर १४ गुंठे शेती आहे. कुटूंबाची गुजराण याच शेतीवर आणि सोबतीला तीन शेळया. यावेळी आपबिती सांगताना चोपकर म्हणाले, मागच्यावर्षी धानावर किड आली. गाठीला पैसा नव्हता, तेव्हा आंगठी गहाण ठेवून औषध फवारणी करायला सावकाराकडून आठ हजार रूपयाचे कर्ज घेतले. किडीतून वाचलेले पीक काही दिवसात घरात येणार पण निसर्गाने इथेही पाठ सोडली नाही. गारपिटीने अख्खे पीक होत्याचे नव्हते केले. हातातोंडाशी आलेल पिक डोळयादेखत भुईसपाट झालेले पाहताना जीव कासावीस झाला. कसतरी दिवस ढकलणे सुरू होते. कुटंूबाचा उदरनिर्वाह शेतीवरच असल्यामुळे यंदाच्या हंगामात पेरणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून या चिंतेत असताना पत्नी मंगळसुत्र गहाण ठेवायला तयार झाली. पुन्हा आठ हजाराच कर्ज काढून यावर्षी धानाची लागवड केली.यंदाही शेतीची तीच अवस्था होती. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची आणि दागिने कसे सोडवायचे या विचाराने जीव टांगणीला लागला होता. पण अचानक सावकाराने बोलावणे पाठवले. पेढीवर आलो तर सावकाराने सर्व दागिने परत केले. तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. शासनाने सावकारी कर्जाचे ओझे उतरवून आम्हाला निश्चिंत केले, याचा आज खुप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया चोपकर यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)
अखेर सावकारी कर्जाचे जोखड उतरले...
By admin | Updated: October 31, 2015 01:35 IST