गणेशपूर येथील सुभाष वाॅर्ड व गांधी वाॅर्डाला मिळाला थ्री फेज वीज पुरवठा
भंडारा : ४ वर्षांपासून गणेशपूर येथील सुभाष वाॅर्ड व गांधी वाॅर्डातील जवळपास १०० कुटुंबीयांना अंधूक (डीम लाइट) वीज पुरवठा होत असल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात येथील नागरिकांना या वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत रहिवाशांनी स्थानिक प्रतिनिधींना तक्रारी दिल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने शेवटी नागरिकांनी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांना डिम लाइटची समस्या सांगितली. याची त्वरित दखल घेतली. महावितरणच्या अभियंत्यांना याबाबत पाठपुरावा करून मस्के यांनी टू फेज लाइटऐवजी थ्री फेज लाइट देण्याची मागणी केली. अखेर महावितरणच्या अभियंत्यांनी बुधवार, २५ ऑगस्ट रोजी थ्री फेज वीज पुरवठा सुरू केल्याने अखेर ४ वर्षांनंतर सुभाष वाॅर्ड व गांधी वाॅर्डातील जवळपास १०० कुटुंबांची अंधूक वीज पुरवठ्यापासून सुटका झाली.
दक्षिण महावितरण केंद्र, भंडारा शहर उपविभाग अंतर्गत गणेशपूर येथील सुभाष व गांधी वाॅर्ड येथे पोल क्र. १५१० ते १५२० वरील वीज ग्राहकांना लघुदाब वाहिनीवरून कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात होता. यामुळे येथील रहिवाशांना अंधूक (डीम लाइट) वीज पुरवठा मिळत होता. सदर कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रकार मागील उन्हाळ्यापासून सतत सुरू असल्याने येथील जनतेला तारेवरची कसरत करून त्रासात जीवन जगावे लागत असल्याने या समस्येबाबत नागरिकांनी स्थानिकांकडे तक्रारी केल्या. संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही लेखी व तोंडी तक्रारी देण्यात आल्या. या तक्रारीत थ्री फेज वीज पुरवठा देण्याची मागणी करण्यात आली होती. दोन्ही वाॅर्डांचा कुणीच वाली नसल्याने महावितरणने सुद्धा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
शेवटी येथील रहिवाशांनी डीम लाइटची कैफियत आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांना सांगितली. त्यांनी मागील दोन महिन्यांपासून वीज पुरवठ्याच्या समस्यांचा पाठपुरावा महावितरणच्या अधिकाऱ्यांना करून थ्री फेज वीज पुरवठा देण्यासाठी त्यांना निवेदनही दिले. सदर निवेदनात सुभाष वाॅर्ड व गांधी वाॅर्डात ग्राहकांची संख्या वाढली. आजूबाजूच्या परिसरात अनेक लेआऊट पडल्याने त्यांनाही याच खांबांवरून वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, या खांबांवरून सिंगल फेज वीज पुरवठा केला जात असल्याने या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने येथील जवळपास १०० च्या वर कुटुंबीयांना अंधूक (डीम लाइट) वीज पुरवठा मिळत आहे.
यामुळे त्यांना नरकयातना भोगून जीवन जगावे लागत असल्याने सिंगल, टू फेजऐवजी थ्री फेज वीज पुरठ्याची सोय करून देऊन या परिसरात ट्रान्सफाॅर्मरही लावावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. काही दिवसांपासून मस्के यांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावाही केला होता. त्यांच्या निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुभाष व गांधी वॉर्ड या परिसराचे निरीक्षण करून सिंगल फेज तीन वायरचे कनेक्शन थ्री फेज पाच वायर लघुदाब वाहिनीमध्ये करण्यासाठी ५३ हजार ५९५ रुपयांची अंदाजपत्रक दुरुस्ती योजना मंजूर करून २५ ऑगस्ट रोजी महावितरणने त्या खांबावरून थ्री फेज वीज पुरवठा जोडला. यामुळे दोेन्ही वॉर्डांतील १०० कुटुंबीयांची अंधूक वीज पुरवठ्यातून सुटका झाल्याने येथील रहिवाशांनी आदर्श युवा मंचचे पवन मस्के यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.