क्रीडा संकुलात मुख्य कार्यक्रम : ८.३४ लाख वृक्ष लावणारभंडारा : शुक्रवार १ जुलै रोजी जिल्हाभरात वन महोत्सव आयोजित करण्यात आला असून शासनाच्या विविध विभागासह सामाजिक संस्था व वैयक्तिकरित्या नागरिक मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन वन महोत्सव साजरा करणार आहेत. वन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने वन महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हाभरात ८ लाख ३४ हजार ४७४ वृक्ष लावले जाणार आहेत.वृक्षारोपणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आला असून खासदार नानाभाऊ पटोले, आमदार रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, पालक सचिव दीपक कपूर, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी व उपवन संरक्षक एन. आर. प्रविण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुन होणार आहे. शासनाच्या वतीने भंडारा जिल्ह्याला ७ लाख ५९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्या होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ८ लाख ३४ हजार ४७४ वृक्ष लावले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात ८ लाख ३४ हजार ४७४ खड्डे खोदण्यात आले आहे. हे वृक्षारोपण १६९० ठिकाणी करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोहिमेची माहिती छायाचित्रासह संकेतस्थळ व मोबाईल अॅप्लीकेशनवर अपलोड करण्यात येणार आहे. विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खाजगी उद्योग, सामाजिक दायित्व, सहकारी संस्था, विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, एनएसएस, स्काऊट गाईड, नेहरु युवा केंद्र यांचेसह अनेक उपक्रमशिल व्यक्ती उद्या जिल्हाभर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहेत. यासाठी वन विभागाने रोप उपलब्ध करुन दिले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर व उपवन संरक्षक एन. आर. प्रविण यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात आज सर्वत्र साजरा होणार वनमहोत्सव
By admin | Updated: July 1, 2016 00:37 IST