भंडारा : वैद्यकीय किंवा अन्य कारणाने रजेवर असलेल्या शिक्षकांचे वेतन नियमित देण्यात येत आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळेत रुजू झालेल्या शिक्षकाचे वेतन जिल्हा परिषद शिक्षण विभागानेच अडविल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मागील ६० दिवसांपासून धनराज वाघाये हे शिक्षक त्यांचे वेतन मिळावे, यासाठी शिक्षण विभागाचा उंबरठा झिजवित आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे.जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने समायोजन प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेतून लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथील धनराज वाघाये यांची भंडारा पंचायत समितीअंतर्गत पचखेडी येथे बदली झाली. दरम्यान त्यांना पचखेडीला रूजू होण्याचे आदेश बजावल्यानुसार वाघाये पचखेडीला पोहचले. तेथील शिक्षिका जिभकाटे यांची पवनी पंचायत समितीअंतर्गत एका जिल्हा परिषद शाळेवर बदली करण्यात आली. मात्र, त्या वैद्यकीय रजेवर गेल्याने पचखेडीची जागा रिक्त झाली नाही. त्यामुळे वाघायेंना पचखेडीला रूजू करून न घेता त्यांना ठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवर अतिरिक्त शिक्षक म्हणून रूजू होण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. आदेशानुसार वाघाये मागील दोन महिन्यांपासून ठाणा येथे कर्तव्य बजावत असतानाही त्यांचे वेतन मात्र थांबविले आहे.त्यांनी शिक्षण विभागाचे अनेकदा उंबरठे झिजविले. प्रत्येक वेळेस त्यांना उडवाउडवीचे उत्तर देवून त्यांची बोळवण करण्यात आली. नविन शैक्षणिक सत्रापासून वाघाये हे शिक्षण विभगाच्या आदेशानुसार रूजू झालेले असतानाही त्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. जून व जुलै महिन्याचे वेतन तर थांबलेलेच आहेत. परंतु आता आॅगस्ट महिन्याचेही वेतनाबाबतचे सोपस्कार पार पडल्याने आॅगस्ट महिन्याचेही वेतन त्यांना मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. याबाबत शिक्षण विभाग शिक्षण वाघाये यांच्याशी सारिपाटचा खेळ खेळत असून वेतन शिक्षण विभाग देत नसल्याने शिक्षकांनी चोरी करायची काय? असा संताप शिक्षक संघटना विचारत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ शिक्षणाधिकारी यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. (शहर प्रतिनिधी)आदेश नसतानाही प्रकरणाची फाईल बनली कशी? वाघाये यांच्या वेतनासंबंधी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना वेतन देण्यासंबंधी आदेश बजावले आहे. त्यानुसार वाघाये यांचे पर्यायी व्यवस्था करून वेतन ताबडतोब देण्याचे आदेश आहेत. यामुळे शिक्षण विभागाने त्यासंबंधी प्रकरण तयार केले आहे. यावर शिक्षण विभागाचे संबंधीत लिपीक, अधिक्षक व उपशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी झालेली असून अंतिम स्वाक्षरीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) सुवर्णतला घोडेस्वार यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. मात्र, घोडेस्वार यांनी त्यावर स्वाक्षरी न करता प्रकरण थांबविल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे.प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भोर यांनी मला आदेश दिलेले नाही. वाघाये यांचे प्रकरण आयुक्तांकडे गेलेले आहे. त्यांच्याकडून आल्यानंतर वेतन देण्यात येईल. शालार्थ प्रणालीमुळे वेतन देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. भोर यांना वेतन देण्यासंबंधी येणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत. या प्रकरणात मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.-सुवर्णलता घोडेस्वार, शिक्षणाधिकारी (प्राथ.)माझ्याकडे १० ते १५ दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रभार होता. आता नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी आलेले असल्याने त्या प्रकरणावर बोलने योग्य नाही. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ.) याच योग्य माहिती देतील.-जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडाराशिक्षण विभागाच्या आदेशानुसार वाघाये हे ठाणा येथे रूजू झालेत. मात्र, त्यांचे वेतन थांबविण्याचा संतापजनक प्रकार शिक्षण विभागानेच केलेला आहे. यामुळे शिक्षकाच्या वेतनासंबंधीच्या शिक्षणाधिकारी घोडेस्वार यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.-मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महा. राज्य. प्राथ. शिक्षक संघ, भंडारा.
शिक्षकाची वेतनासाठी फरफट
By admin | Updated: August 27, 2016 00:24 IST