भंडारा : डी.एड. च्या द्वितीय वर्षाचे परीक्षेचे फॉर्म भरून घेण्यात आले. मात्र परीक्षेची फी आकारण्यात आली नसल्याने आगामी काळात डी.एड.च्या परीक्षेपासून श्री साई अध्यापक महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थीनी परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या आशयाची माहिती खुद्द विद्यार्थीनींनी आज येथील विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत दिली.या पत्र परिषदेला विद्यार्थीनी अपेक्षा मालाधारी, स्रेहा सार्वे, अल्का शिवरकर, अश्विनी गौतम, शुभांगी मेश्राम आदी उपस्थित होते. विद्यार्थीनी म्हणाल्या, अध्यापक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून जानेवारी महिन्यात डी.एड च्या द्वितीय वर्षांतर्गत परीक्षेसाठी फार्म भरून घेतले. मात्र परीक्षेची फी मागितली नाही. ८ जून पासून डी.एड. ची परीक्षा सुरू होणार आहे. फी आकारली नसल्याने परीक्षेत बसता येईल की नाही, याबाबतही संभ्रम कायम आहे. तसेच अंतिम 'लेसनप्लॅन'ही घेण्यात आले नाही. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची भिती बळावली आहे.शुभांगी मेश्राम नामक विद्यार्थीनी म्हणाली, सन २०१४ मध्ये डी.एड.ची परीक्षा दिली. मात्र प्रात्यक्षीक परीक्षेचे गुण संबंधित विभागाकडे पोहचले नसल्याने सर्वांचेच निकाल रोखण्यात आले आहे. त्यामुळे निकाल पत्राच्या प्रतिक्षेत हे वर्ष वाया गेले. संबंधित महाविद्यालयाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देवून जून होणाऱ्या परीक्षेत बसण्याची संधी द्यावी व विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)
परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती
By admin | Updated: March 26, 2015 00:32 IST