आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील १० शेतकऱ्यांना शासनाच्या धडक सिंचन विहीर योजना सन २०१६-१७ अंतर्गत विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, मुदत संपूनही विहिरींचे खोदकाम करण्यासाठी शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. परिसरात खोदलेल्या खाजगी विहिरी व बोअरवेल्स कोरड्या असल्याने आर्थिक व मानसिक त्रास का सहन करावा, असा त्यांचा प्रश्न आहे. तलावाच्या परिसर म्हणून ओळख असलेल्या करडी परिसर मागील अनेक वर्षांपासून कोरड्या दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे.नैसर्गिक पाण्याचे सर्व स्त्रोत जानेवारी संपण्यापुर्वीच आटले आहेत. गावातील खाजगी विहिरींची पाण्याची पातळी तळाला गेली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदकाम झालेले तलावही कोरडे पडण्याच्या मार्गात आहेत. जमिनीला ५ ते १० फुटापर्यंतच्या भेगा पडल्या असून मागील तीन वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना धानाचे पीक घेता आले नाही. खरीपात शेतीसाठी केलेली मेहनत व खर्च वाया जावून कर्जाचे डोंगर शेतकऱ्यांच्या माथ्यावर आहेत.धडक सिंचन विहिरी अंतर्गत करडी येथील किशोर शंकर लोंदासे, कल्पना गजानन थोटे, जितेंद्र रविकांत साठवणे, विनय छबीराम भडके, रमेश हरीराम घावळे, यमूना यादोराव साठवणे, मारोती सोमा साठवणे, गणेश सुरेश ठवकर, विनय सुर्यभान साठवणे, गंगा भय्याजी साठवणे या १० शेतकऱ्यांना विहीरी मंजूर झाल्या आहेत.मात्र, भुगर्भात पाण्याचा साठा नसल्याचे कारण देत अनेकांनी विहिरीचे बांधकाम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. परिसराला सिंचनक्षम करण्याची क्षमता कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी असलेल्या तलावात आहे. मामा तलाव उथळ व गाळाने गजबजलेले आहेत. अतिक्रमणाची समस्या बिकट झालेली असून तलावाची आपासी अतिशय कमी आहे.त्यातच तलावांचे गेट, पाट नादुरुस्त असल्याने पाहिजे तेवढे पाणी तलावात साठविता येत नाही. त्यातच पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने बोरवेल्स व विहिरींना पाहिजे तसे पाणी मिळत नसल्याने शेतकºयांत नाराजीचा सुर आहे.गरजवंत शेतकरी योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना विहिरी खोदून पाण्याचे पुर्न:भरण करायचे आहे. मात्र, ज्यांना विहिर खोदण्याची मंजुरी मिळाली, त्यांना विहिर बांधकामाची इच्छा नाही. अशी विसंगत स्थिती असल्याने नाईलाज होत आहे.- महेंद्र शेंडे, सरपंच करडी
विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांनी दिला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:46 IST
मोहाडी तालुक्यातील करडी येथील १० शेतकऱ्यांना शासनाच्या धडक सिंचन विहीर योजना सन २०१६-१७ अंतर्गत विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या.
विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांनी दिला नकार
ठळक मुद्देधडक सिंचन योजनेला खो : २५ लाख रूपयांचा निधी जाणार परत