पालांदूर(चौ.) : शेतकऱ्यांच्या साधेपणाचा लाभ घेत धान बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एका धानपिकाचे वाण १५०-१६० दिवसांचे असून खरेदी करतेवेळी केवळ १२०-१२५ दिवसाचे असल्याचे सांगितले. यामुळे पालांदूर परिसरातील नापिकी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.शेतकरी बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करतो. खरेदी करतेवेळी कंपनी जसे सांगेल तसे कृषिकेंद्रमालक शेतकऱ्यांना सांगतो. शेतकरी विश्वास ठेवून मागेल ती किंमत देवून बियाणे खरेदी करतो. मात्र हे बियाणे कधी भेसळ तर कधी हलके, भारी लागून शेतकऱ्यांची ‘वाट’ लावतात. अशाच प्रकार खैरी-कवडसी येथील गोपाल मेश्राम या शेतकऱ्यासोबत घडला. सहा एकरात हलके धान म्हणून एका वाणाचे धान लावले. मात्र झाले उलटेच. धान १५०-१६० दिवसाचे लागल्याने संपूर्ण शेतातील धान पाण्याविना सुकले. शेतकऱ्याकडे पक्के खरेदी बिल असून पंचनामासुद्धा केला असून कंपनीच्या विरोधात कृषिविभागाकडे न्याय मागितला आहे. उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांनी संगठीतपणे निर्धाराने कंपनीच्या विरोध ग्राहकमंचात न्याय मागता येऊ शकते, असे सांगितले. शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क केला असता केवळ बियाणाची मूळ रक्कम म्हणजे ५ किलोचे ३५० रूपये परत करण्याची तयारी दर्शविली. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना फसविले धानाच्या वाणाने
By admin | Updated: November 17, 2014 22:47 IST