तिकिटाचे अर्धे पैसे दिले : प्रवाशाने व्यवस्थापनाला केली तक्रारतुमसर : तुसमर रोड रेल्वे स्टेशन येथून कलकत्ता येथे जाण्यासाठी तिकिटाचे आरक्षण करण्यात आले. मात्र, आरक्षण देणाऱ्या लिपिकाच्या चुकीमुळे प्रवासी दिल्लीला जाऊ शकले नाही. रेंगेपार येथील सरपंच शिवलाल नागपूरे हे रेंगेपार पुनर्वसनाच्या कामासाठी दिल्लीला जाणार होते. त्यांनी २८ जुलैला प्रवास करण्यासाठी तुमसर रेल्वे स्टेशन येथून २४ जुलै २०१५ ला नागपूर -हजरत निजामुद्दीन ३ हायर एसीचे तिकीट आरक्षित पध्दतीत बनविले. याबदल्यात त्यांनी १,३६० रुपये दिले. दिल्लीला जाण्यासाठी ते २८ जुलैला नागपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेत बसले. प्रवासादरम्यान तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी तिकीट तपासली असता ते बनावट असल्याचे सांगुन शिवलाल यांना प्रवास करण्यास मज्जाव केला.तिकीटवर पीएनआर नंबर, प्रवासाची तारीख नसल्याने रेल्वेने पुढील प्रवास करता येणार नसल्याची माहिती रेल्वे तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी शिवलाल यांना दिली. त्यामुळे त्यांनी तुमसर रोड रेल्वे स्टेशन गाठून बुकींग अधिकाऱ्यांना तिकीटाबद्दल विचारणा केली. याबाबत त्यांनी तक्रार पुस्तिकेवर लिखित तक्रार नोंदविली. तिकीटबाबत समाधानकारक उत्तर न देता त्यांना तिकिटाच्या भाड्याच्या रकमेपैकी अर्धे पैसे परत केले. रेल्वे कर्मचाऱ्याच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे रेल्वे प्रवाशाला दिल्लीचा प्रवास करता आला नाही. रेल्वे प्रशासन एकीकडे पारदर्शक प्रशासन देऊन रेल्वे प्रवाशांना सौजन्याची वागणूक देण्याची अंमलबजावणी करीत आहे. असे असताना तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून आरक्षण केलेल्या रेल्वे प्रवाशासोबत असा प्रसंग घडल्याने रेल्वेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. त्यामुळे अशा घटना भविष्यात होवू नये, याची रेल्वे प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करून याला जबाबदार असलेल्या लिपिकावर कारवाई करण्याची मागणी शिवलाल नागपुरे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आरक्षण लिपिकाच्या चुकीचा रेल्वे प्रवाशाला फटका
By admin | Updated: August 6, 2015 01:44 IST