चुल्हाड (सिहोरा) : कवलेवाडा गावात करण्यात आलेल्या विविध विकास कामात निधी खर्चात तफावत आढळून आली आहे. सिमेंट रस्ता, नालीचे बांधकाम निकृष्ठ करण्यात आले असून राहयो निधीचा बोजवारा वाजविण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. चौकशीच्या मागणीवरून सदस्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे.बावनथडी नदी काठावर असलेल्या २ हजार लोकवस्तीच्या कवलेवाडा गावात विकास कामात निधी खर्च करताना हयगय करण्यात आली असून, या कामाची गुणवत्ता नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. सन २०१३-१४ या सत्राच्या कालावधीत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. या गावात रोहयो अंतर्गत पतीराम उमरे ते सदाशिव बोरकर आणि मडगू गहाने ते गाव तलाव पर्यंत कुशल कामे करण्यात आली आहे. पांदन रस्त्याच्या कामात अल्प मुरूम घालण्यात आलेला असून रोलरचा उपयोग करण्यात आलेला नाही. या कामावर फक्त ५ मजूरांनी काम केले असून ५८ मजुरांच्या नावे २ लाख ८१ हजार रूपयाची उचल करण्यात आली आहे. रोजगार सेवक हे ग्रामपंचायतचे सदस्य असून पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नोंद मजुरांच्या यादीत करण्यात आली आहे. या कामाचे माहिती फलक लावण्यात आले नाही. वर्षभरातच या पांदन रस्त्यावरील मुरूम गायब झाल्याचे चित्र आहे.या गावात २०१३-१४ या कालावधीत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत ३ लाख २५ हजार खर्चाची नाली बांधकाम करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रभुदास जनबंधू ते उदाराम तांडेकर असे नाली बांधकामाचे स्वरूप आहे. परंतु प्रत्यक्षात दस्तऐवजाच्या नोंदीनुसार या नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. याशिवाय जुन्याच नालीची नोंद यात करण्यात आली आहे. मात्र देयकांची उचल करण्यात आली आहे. या गावात आंबेडकर चौक ते पाणी टाकी पर्यंत गेल्या वर्षात ४ लाख ७८ हजार ७०४ खर्चून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. रस्ता बांधकामात गुणवत्ता नसल्याने हा रस्ता उखडला आहे. वर्ष भरातच रस्ता उखडल्याने निकृष्ठ बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद राजस्व निधी अंतर्गत पशु दवाखाना आवारात ४ लाख ९३ हजार रूपये खर्चून आवारभिंत तथा सपाटी करणाचे कामे करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मुरूमाचा लालीपॉप देण्यात आलेला आहे. सपाटीकरणाच्या नियोजनात दिशाभूल करण्यात आली आहे. या गावचे सामाजिक कार्यकर्ते दुर्गा अग्रवाल यांनी ग्राम पंचायत माहिती अधिकारातून माहिती मागितली असता ही बाब निदर्शनास आली आहे. माहिती देताना प्रत्यक्षात ६२ पानाचे राशी वसूल करण्यात आली असून ४८ पानाची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित पानात आलबेल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.विकास कामात निधी खर्चात तफावत असल्याच्या कारणावरून ग्राम पंचायत सदस्य सुभाष सोनवाने यांनी चौकशीची मागणी केली आहे. ९ सदस्यीय या ग्रामपंचायतमध्ये सदस्यांना विरणसात घेतले जात असे आरोप होत आहेत. यामुळे ग्रामपंचायतमध्ये वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी सरपंच वैशाली नंदेश्वर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधले असता नॉट रिचेबल होते. यामुळे संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)
विकास निधी खर्चात तफावत उघडकीस
By admin | Updated: March 1, 2015 00:36 IST