तुमसर : तुमसर रोड रेल्वे यार्डात उभ्या मालवाहतूक गाडीतून उच्च दर्जाचे मॅग्नीज चोरी प्रकरणात स्थानिक सुरक्षा बळातील पोलीस उपनिरीक्षकांनी हयगय करणे व जबाबदारी पार न पाडल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने त्यांची उचलबांगडी केली. त्यांचे नागपूर मुख्यालयात स्थानांतरण करण्यात आले. केवळ स्थानांतरण करणाऱ्या रेल्वे प्रशानाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर रोड रेल्वे यार्डात उभ्या मालवाहतूक गाडीतून उच्च दर्जाचे मॅग्नीज चोरी प्रकरणात सहा चोरट्यांना नागपूर येथील रेल्वे पथकाने अटक केली होती. या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने तुमसर रोड येथील रेल्वे सुरक्षा बळाचे पोलीस उपनिरीक्षक टेंभूर्णीकर यांचेवर ठपका ठेवण्यात आला. कामात हयगय करणे व जबाबदारी योग्य रीतीने पार न पाडणे याचा त्यात समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने मॅग्नीज चोरी प्रकरणात गंभीर दखल घेतली. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक यांचे स्थानांतरण नागपूर मुख्यालयात केले. केवळ स्थानांतरण करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.नागपूर येथील रेल्वे पथकाने मॅग्नीज टोळी गजाआड केली तेव्हा रेल्वे पोलीस उपनिरीक्षक टेंभूर्णीकर रजेवर होते. कर्तव्यावर ते नव्हते, मग त्यांना जबाबदार कां धरण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होतो. यामागचे कारण येथे मागील अनेक महिन्यापासून मॅग्नीज चोरीचे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलले जात आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर १५०० रेल्वे कर्मचाऱ्यांची फौज असून यार्डच्या बाजूला अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सदनिका आहेत. केवळ सुरक्षा बळाच्या प्रमुख अधिकाऱ्यावर येथे कारवाई करण्यात आली. स्थानांतरण ही मुळ कारवाईच नाही. स्थानांतरण ही सेवेतील अविभाज्य प्रक्रिया आहे. गंभीरतेचा प्रथम आव आणणाऱ्या रेल्वे प्रशासनाने नंतर मूग गिळून गप्प झालेले दिसते. मॅग्नीज खरेदीदारांचा येथे अजूनपर्यंत पत्ताच नाही. शेवटपर्यंत येथे शोध घेण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने कां घेतली नाही हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)
अखेर रेल्वे पोलीस उपनिरीक्षकांची उचलबांगडी
By admin | Updated: March 16, 2015 00:25 IST