मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश : नाना पटोले, बाळा काशीवार यांचा पाठपुरावासाकोली : जिल्ह्यात कृषी पंपासाठी फक्त आठ तास विद्युत पुरवठा मिळत होता व १६ तासांचे भारनियमन होते. या भारनियमनाच्या विरोधात साकोली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत आमदार बाळा काशीवार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन भारनियमनाचा प्रश्न सोडविला. आता कृषी पंपांसाठी १६ तास विद्युत पुरवठा मिळणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आ. बाळा काशीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्ह्यात कृषीपंपासाठी १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले होते. या भारनियमनामुळे उन्हाळी धानपिक धोक्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी तर धानाचे पऱ्हे भरले मात्र आठ तासाच्या पाण्यामुळे पिक वापणार नाही म्हणून पऱ्हे तसेच ठेवले. अखेर साकोली येथे शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मागील आठवड्यापासून आमरण उपोषणाला सुरवात केली. या उपोषण मंडपाला आ. बाळा काशीवार यांनी भेट देवून भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आमदार बाळा काशीवार हे तातडीने मुंबई येथे रवाना झाले व खा. नाना पटोले यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्याची शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या सांगितली. यावर मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी १६ तास सुरू असलेले भारनियम कमी करून कृषीपंपांसाठी १६ तास विद्युत पुरवठा करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या आदेशाची अंमलबजावणी येत्या एक दोन दिवसात होणार असल्याचीही माहिती आ. काशीवार यांनी लोकमतला दिली. त्यामुळे खा. नाना पटोले व आ. काशीवार यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
अखेर कृषीपंपांना मिळणार १६ तास वीज
By admin | Updated: March 3, 2017 00:42 IST