इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६४ वर्षे पूर्ण होत असताना जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा डाग पुसून काढण्यात प्रशासनाला अजूनही यश लाभलेले नाही. क्षेत्रात असलेल्या उद्योगांची वाढ खुंटल्याने जिल्ह्याची ओळख निर्माण झाली नाही. या उद्योगांसाठी राखीव क्षेत्र असलेल्या एमआयडीसीत अनेकांनी भूखंड बळकावले; परंतु ज्या प्रमाणात उद्योग स्थापन व्हायला हवे होते, तसे झाले नाही.
भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील राजेगाव (गुंथारा) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) असून, सध्या केवळ तीन-चार कंपन्या आहेत, ज्या अगदी सहज हाताच्या बोटावर मोजता येतात. इतर कंपन्या बंद अवस्थेत आहेत. मध्यंतरी नव्या कंपन्यांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. मात्र, तो प्रयासही निष्फळ ठरला. मोकळ्या जागेचा वापर करून नवीन उद्योग आणून परिसरातील तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राजेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आली होती. मात्र, यात यश आलेले नाही.
राजेगाव एमआयडीसीमध्ये सध्या हिंदुस्तान कंपोझिट लिमिटेड, तसेच काही छोट्या कंपन्या आहेत. एकीकडे कंपन्यांचा अनुशेष, तर दुसरीकडे येथे असलेल्या मोठ्या कंपन्यांकडून प्रदूषण नियंत्रण कायद्याची होत असलेली पायमल्ली महत्त्वाचा विषय ठरला आहे. काही कंपन्यांच्या बहुतांश इमारती जीर्ण इमारती आहेत. राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळ असल्यामुळे, मोडकळीस आलेल्या इमारतींचा वापर अवैध तत्त्वांसाठी केला जातो. मोकळ्या इमारती व जमिनीचा वापर करण्यासाठी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बोलावण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी केली आहे.
कायापालट होणार काय? एकीकडे देशात कारखाने सुरू करण्यासाठी उद्योजकांना जागा मिळत नाही. दुसरीकडे राजेगाव एमआयडीसीमध्ये मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत. कुणी भूखंड बळकावून ठेवले आहेत. लोकप्रतिनिधींनी एमआयडीसीकडे लक्ष द्यावे, या ठिकाणी कारखाने आणण्याचे काम झाले पाहिजे. कायापालट होणार का, असा सवाल आहे. तालुक्यात अपेक्षित असा उद्योगांचा विकास नाही. रोजगाराच्या आशा कायम आहेत. तालुक्यात महिलांचे गावागावांत बचत गट आहेत; पण प्रत्येक गटाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग केंद्र उभारण्याची गरज आहे.
कामगारही अडचणीतया एमआयडीसी परिसरात असलेल्या कामगारांचीही गळचेपी होत असल्याचे दिसून येते. मात्र बोलायला कुणीही तयार नसल्याचे आढळून आले