भंडारा : पावसाला सुरुवात झाली की सर्वांनाच वेध लागतात ते पंढरपूरच्या आषाढी वारीचे. आषाढी वारीनंतर श्रावण महिना लागला की एका पाठोपाठ येणाऱ्या एका सणांमुळे नवविवाहितांना आपल्या माहेराची आठवण व्हायला लागते. सासरी राहणाऱ्या सासुरवासीणींना आपल्या माहेराची दररोज आठवण होते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अनेक सासुरवाशीणींना कोरोना संसर्गामुळे आपल्या माहेरी जाता आलेले नाही. त्यामुळे माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा असे माहेरवाशीणींच्या तोंडून वाक्ये ऐकू येत आहेत. स्त्रियांसाठी नागपंचमी सण आनंदाची पर्वणीच असते. अनेक गावांत नागपंचमीला यात्रा भरते. त्यामुळे वर्षभर नागपंचमी सणाची वाट आतुरतेने पाहणाऱ्या नवविवाहितांना किमान यावर्षी तरी आपल्या माहेरी जायला मिळेल का, याकडे लक्ष लागून आहे.
बॉक्स
कोरोना काळात ५१ विवाहाची नोंद
यावर्षी जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येताच ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र विवाह सोहळे कमीच झाले आहेत. मात्र असे असले तरी आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने विवाह होऊ लागले आहेत.
नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात ...
कोट आई
माझी मुलगी लग्न होऊन एक वर्षापूर्वी सासरी गेली आहे. त्यामुळे आजही सारखी तिची आठवण येते. आता कोरोना आणि शेतीच्या कामामुळे माहेरी तिचे जास्त येणे-जाणे होत नाही. अनेक कार्यक्रमही करता आले नाहीत. यावर्षी श्रावण महिन्यात मात्र मुलगी व जावयांना बोलावून कार्यक्रम करणार आहे.
शीतल घाटोळे
कोट आई
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही अजूनही मनामध्ये भीती मात्र कायम आहे. मुलीला माहेरी आणावेसे वाटते. मात्र, तिच्या सासरच्या मंडळींकडून माहेरी जाण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आम्ही आणू शकलेलो नाही. तरीही कान्होबाच्या वेळेस ती घरी येणार असल्याने आतापासूनच आनंद होत आहे.
विनिता शेंडे
नवविवाहिता कोट
प्रत्येक नवविवाहितेला लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सण, उत्सवानिमित्ताने कधी एकदा आपल्या माहेरी जाते असे होते. पुन्हा एकदा आई-बाबांसोबत प्रेमाचे चार घास कधी खायला मिळतात, असे वाटते. मात्र, आता खरिपाची कामे सुरू असल्याने माहेरी जाता येत नाही. नागपंचमी सणाला मात्र मी अवश्य जाणार आहे.
पूनम गायधने.
नवविवाहिता कोट
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी गतवर्षी माझे लग्न झाले. मात्र, गेल्या वर्षी नागपंचमी सणाला जायला मिळालेच नाही. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग नसल्याने श्रावण महिन्यात मी माहेरी जाणार आहे. अनेक दिवसांपासून माहेरची ओढ लागली आहे.
लक्ष्मी साकोरे.