माहिती अभियान कार्यशाळा : राजेश काशीवार यांचे प्रतिपादनसाकोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये सर्वांना समान संघी दिली. त्यामुळे एका साधारण घरातून मी शिक्षण घेऊन पुढे येऊ शकलो आणि राज्यघटनेमुळेच मला आमदार होता आले, असे प्रतिपादन आमदार राजेश काशीवार यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय व सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांची कार्यशाळा घेण्यात आली. साकोली येथे कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती धर्मपाल उंदीरवाडे होते. यावेळी उपसभापती लखन बर्वे, जि.प.सदस्य दिपक मेंढे, सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, गटविकास अधिकारी मोकाशी उपस्थित होते. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अनिल भुसा म्हणाले, बाबासाहेबांनी हिंदु कोड बिल, ओबीसी समाजाला आरक्षण, मजूर कायदा, शेतकऱ्यांसाठीचा लढा, युवक, महिला आणि वाचन संस्कृती रुजविण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत योजनांची माहिती दिली. या योजना लोकप्रतिनिधी व ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अशी कार्यशाळा प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने योजनांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.देवसूदन धारगावे, संजीव गाडे यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गदर्शन केले. मदन बांडेबुचे यांनी जादूटोणा विरोधी कायदयाची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी मोकाशी यांनी केली. या कार्यक्रमाला साकोली तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
राज्यघटनेमुळेच सर्वांना मिळाली समान संधी
By admin | Updated: May 17, 2016 00:20 IST