शासकीय यंत्रणेत खळबळ : शासनाच्या तिजोरीतून पैसा लुटणाऱ्यांची साखळी मोहाडी : प्रत्यक्षात काम न होता बनावट हजेरी रजिस्टर तयार करणे, मोजमाप पुस्तिका तयार करून शासनाच्या तिजोरीतून पैसा लुबाडणारी साखळीच तयार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा रोजगार हमी योजनेच्या कामात 'अर्धे आम्ही अन् अर्धे तुम्ही' असेच होत असल्याचे निदर्शनास येत आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नाला सरळीकरण, पांधन रस्ता, नाली काम, रस्त्यावर मातीकाम, वृक्ष संवर्धनाच्या योजनेतील कामे ग्रामपंचायत स्तरावर केली जातात. असे काम मजुरांकडून केले जातात.रोजगार हमी योजनेतून व मजुरांकडून विविध कामे गावस्तरावर केली जात असताना विशिष्टि मजुरांची मजुरी जास्त काढली जाते. एवढेच नव्हे तर काम न होता बनावट हजेरी पत्रक बनविणे, बनावट मोजमाप पुस्तिका तयार करणे त्याच्यावर सरपंच व खंडविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या घेवून पद्धतशिरपणे शासनाच्या तिजोरीतून पैसा हडप करणारी श्रृंखला मोहाडी तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजागर हमी योजनेअंतर्गत कामे करणारे रोजगार सेवक, सपरंच, ग्रामसेवक, तांत्रिक पॅनलमधील अभियंता व तालुक्याचे प्रशासनिक अधिकारी बीडीओ अशी तयार झाल्याचे कान्हळगाव (सिर.) येथे झालेल्या कामातून प्रत्यक्षपणे दिसायला लागले आहे. शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी विविध उपाय केले आहे. रोहयोच्या कामाबाबत संगणकीकरण झाले. त्यामुळे घरी बसून ही कोणत्या गावात कोणते काम झाले. किती मजूर होते. मजुरी किती पडली आदी बाबी माहिती होवू लागल्या आहेत. यामुळेच कान्हळगाव (सिर.) येथे नाला सरळीकरण व पांदन रस्त्याचे का न होता बनावट हजेरी पत्रक व मोजमाप पुस्तिका तयार करून शासनाचा पैसा घशात घालण्यात आल्याची घटना उघडकीस आणल्याने यंत्रणामध्ये खळबळ वाढली आहे. यावरून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात शासनाची तिजोरी रिकामी करणारीच टोळी सक्रीय झाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
रोजगार हमी योजना, अर्धे आम्ही अन्..
By admin | Updated: August 24, 2015 00:48 IST