आठ उमेदवार रिंगणात : राकाँ, काँग्रेस, भाजप मैदानाततुमसर : तुमसर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक प्रशांत उके यांच्या मृत्युमुळे रिक्त जागेकरीता येत्या १० जानेवारी रोजी निवडणुक होत आहे. याकरीता आठ उमेदवार रिंगणात असून राकाँ, काँग्रेस व भाजपने उमेदवार उभे केले आहे. सत्ताधारी राकाँकरीता ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रभाग क्रमांक १ (ड), सर्वसाधारण असून या प्रभागात आंबेडकर वॉर्ड, गौतम वॉर्ड व गांधी वॉर्डाचा समावेश आहे. या प्रभागात एकूण मतदारांची संख्या पाच हजार ७०२ इतकी आहे. यात पुरूष मतदार दोन हजार ७१७ व महिला मतदार दोन हजार ९८५ आहे. सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथून तिनही उमेदवार राकाँचे निवडून आले होते. पोटनिवडणुकीत येथे राकाँ, काँग्रेस पुन्हा आमने सामने उभे आहेत. येथे दोन्ही पक्षांनी युती केली नाही. वेगळे लढणेच येथे दोन्ही पक्षानी ठरविले आहे. माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे पुन्हा मैदानात आहे. परंतु या खेपेला जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत यात प्रमोद गडपायले राकाँ, किशोर भवसागर अपक्ष, नवनाथ मेश्राम भाजप, निलेश वासनिक काँग्रेस, अमरनाथ रगडे अपक्ष, सुधीर डहाट अपक्ष, नितीन गजभिये अपक्ष, अनिल साठवणे अपक्ष यांचा समावेश आहे. १० जानेवारी रोजी निवडणूक असून ११ जानेवारी रोजी मतगणणा आहे. तुमसर नगरपरिषदेवर राकाँची एक हाती सत्ता आहे. २३ सदस्यीय नगर परिषदेत राकाँ १४ भाजप ५, काँग्रेस ३, अपक्ष १ असे संख्याबळ आहे. त्यामुळे राकाँ करीता ही निवडणुक प्रतिष्ठेची आहे. तुमसर नगरपरिषदेची निवडणूक २०१६ च्या अखेरीस होत आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगीत तालीम मानली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीकरीताही ही निवडणूक महत्वाची आहे. राकाँ येथे पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असली तरी काँग्रेस, भाजप व माजी नगराध्यक्ष रगडेसुद्धा निवडणुकीचा रंगारंग बदलविण्याची ताकद येथे नक्कीच ठेवतात. प्रत्येक पक्ष व अपक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोटनिवडणुकीने तुमसरातील राजकीय वातावरण तापले
By admin | Updated: December 19, 2015 00:38 IST