साकोली : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गावांचा विकास करताना आम्ही भेदभाव केला नाही. मग ते सिंचन प्रकल्पाचे असो किंवा रस्त्याचे असो. लोकांंच्या अपेक्षेनुसार कामे करून दाखविली. कधी नव्हे ते सीएसआर फंडाचा निधी या दोन्ही जिल्ह्यात आणून कामावर खर्च केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वाभीमानाने केलेल्या विकास कामाची माहिती लोकांना द्यावी. आजही आपण जिल्ह्याच्या विकासाकरीता प्रयत्नशील असून कामे करीतच आहे, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले.येथील एम.बी. पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. राजेंद्र जैन, सभापती नरेश डहारे, मधुकर कुकडे, अविनाश ब्राह्मणकर, सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, सुरेश कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, रवी राऊत, पद्माकर गहाणे उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, १६ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही. बेरोजगारांना रोजगार देणारे, विदेशातून काळा पैसा आणणारे, गरीबी हटविणारे भाजप सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. मच्छिमारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, ऊसाचा प्रश्न, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे काम भाजप सरकार करू शकली नाही.यावेळी तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष प्रदीप मासूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात प्रवेश केला. संचालन प्रभाकर सपाटे यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला अंगराज समरीत, सुरेश बघेल, रामचंद्र कोहळे, जया भुरे, अॅड. अंग्रपाला शिकादेवी वासनीक, लता दुरूगकर, डॉ. अश्विन शेंडे, राशीद कुरैशी, शारदा वाडीभस्मे, सुदामा वाडीभस्मे, नरेंद्र वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रयत्न सुरूच
By admin | Updated: September 24, 2015 00:44 IST