वृक्षतोड जोमात : मुख्यालयी राहातच नसल्याने अवकळादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील १० वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने सध्या वन विभागाचा कारभार वाऱ्यावर आहे. वन तस्कारांचे यामुळे फावले असून वृक्ष कटाईचे प्रमाण वाढले आहे. जंगले विरळ होत असले तरी याचे सोयरसुतक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन लक्षात येते.विविध कारणांमुळे वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सजीव सृष्टी ‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली आहे. निसर्गचक्र बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम सजीवांवर होत आहे. ऋतुंमध्ये होणारा बदल, गारपीट, अतिवृष्टी, वातावरणातील बदल हा त्याचाच परिणाम आहे. वृक्षतोडीविरुद्ध व वृक्ष लागवडीसाठी प्रबोधनाची गरज बळावली आहे. भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब (कांद्री), लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण ३,७१६.६५ भौगोलिक क्षेत्रापैकी १२०३.५५६ चौ.कि.मी. वनाचे क्षेत्र आहे. वनविभागाकडे ८८१.८५४ चौ.कि.मी., महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे ९१.४३६ चौ.कि.मी., वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौ.कि.मी. तर मोहघाटा रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौ.कि.मी. वन क्षेत्र आहे. ५००४७.११९ कि़मी. मध्ये राखीव, २७७.७६७ कि़मी. मध्ये संरक्षीत वन, ९९.६५४ कि़मी. मध्ये झुडपी जंगल तर ४.५१७ वर्ग कि़मी. मध्ये अवर्गीकृत क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यात तसेच परिसरात घनदाट जंगल व वन्यप्राण्यांच्या अधिवास आहे. जंगलात वाघा सारख्या प्राण्यांसह बिबट, हरिण, अस्वल आदी वन्यप्राणी आहेत. तसेच साग व अन्य प्रजातींची मौल्यवान झाडेही आहेत. मानवाच्या जगण्याच्या प्रक्रियेत झाडांचा मोलाचा वाटा आहे. मात्र मानवाने झाडे तोडायला सुरूवात केली आणि त्याचा वापर करायला लागला. त्यामुळे जंगलाची तोड झाली आणि जंगलाचे प्रमाण घटले. जंगलतोडी बरोबर औषधीयुक्त झाडे तोडली जात आहेत.वनांचे रक्षण करण्याची जवाबदारी असलेल्या वन विभागाची असली तरी अनेक दिवसांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाचे काम पूर्णपणे प्रभावित झाले आहे. येत्या काही महिन्यात वनअधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. अनेकांना प्रभार सोपविण्यात आल्याने दोन वन परिक्षेत्र सांभाळताना अधिकाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसते.मुख्यालयाचा फज्जावन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून निवासस्थान बांधण्यात आलेली आहेत. मात्र बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी त्यात राहात आहेत. बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवासस्थानात राहत नाही. शहरातून ये-जा केली जाते. मुख्यालयाचा फज्जा उडत असल्याने जिल्ह्यात असलेल्या जंगलातील सागवानासह इतर महत्वाच्या वृक्षांची कत्तल सुरू आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मूग गिळून गप्प बसले आहेत. या अवैध जंगल तोडीकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करीत आहे. वन विभागाचा भोंगळ कारभार सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जंगलाचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा आहे.
रिक्त पदांमुळे वन विभागाचा कारभार राम भरोसे!
By admin | Updated: October 30, 2015 00:49 IST