पावसाची दडी : अच्छे दिन कधी येणार?पालोरा चौ. : पवनी तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. अनेकांनी आवत्य धान टाकले आहणेत. पावसाने दडी मारल्याने पऱ्हे वाळले. आवत्या धानाची दुबार पेरणी करावी लागत आहे. महागडे धान पिक खरेदी करून वाया गेल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. मात्र भूमिपुत्र म्हणून ओळख असलेले खासदार यांनी शेतीची पाहणी सुद्धा केली नाही. स्वत:ला भूमिपुत्र म्हणून समजणारे खासदार शेतकऱ्यांचे सांत्वन केव्हा करणार? ते मदतीला धावणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दुकानातून महागडे बि बियाणे आणून पऱ्हे टाकले. एकाएकी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरण्या बिघडल्या. पऱ्हे उन्हामुळे करपले. आज ना उद्या पाऊस येणार म्हणून शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आद्रा नक्षत्र संपत येवूनसुद्धा पाऊस सतत हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचे निवडणुकीपासून दर्शन दुर्लभ झाले आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. महागडे धान्य खरेदी करून वाया गेल्यामुळे पुन्हा बियाणे विकत कसे घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अच्छे दिन लाएंगे म्हणणारे पुढारी कुढे गेले, पावसाप्रमाणे त्यांनी सुद्धा दडी तर मारली नाही ना? अशी चर्चेला उत आला आहे. आमदार असताना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाची पेंढी विधानभवनावर जाळून आमदारीकचा राजीनामा दिला होता. तेव्हाच शेतकऱ्यांनी त्यांना भूमिपुत्राची पदवी दिली होती. आता तर साहेब सत्ताधारी पक्षाचे खासदार झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांची गरज असून आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र खासदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजण्याकरिता भेटी घेण्याची वेळ दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By admin | Updated: July 7, 2014 23:25 IST