लाखांदूर : तालूक्यातील बीपीएल धारकांना सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात १०११ इंदिरा व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र यातील अनेक लाभार्थ्यांनी यापूर्वी शासकीय लाभाच्या योजनांचा फायदा घेतल्याने आता त्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार घरकुल योजनापासून मुकावे लागणार आहे. परिणामी शेकडो घरकुल लाभार्थी रद्दबातल ठरणार आहेत.दारीद्र रेषेखालील नागरीकांची गुणानुक्रमे प्रतीक्षा यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात आलेली आहे. त्या आधारावर ग्रामपंचायतनिहाय गरजू लाभार्थ्यांची नावे ठरावानुसार पंचायत समितीला सादर करण्यात आल्या आहेत. लाखांदूर तालुक्यात ६३ ग्रामपंचायती आहेत. ज्या ग्रामपंचायतीची घरकुलाची मागणी कमी आहे. अशा ग्रामपंचायतीला प्राधान्यक्रम देऊन घरकुल वाटपाची मोहीम पंचायत समिती स्तरावर घेण्यात आली आहे. सन २०१३-१४ करीता इंदिरा आवास योजनेअंतर्गत ५९१ तर रमाई आवास योजनेअंतर्गत ४२० असे एकूण १०११ घरकुल उद्दीष्ट देण्यात आले. इंदिरा आवास घरकुल बांधकामासाठी शासनाकडून १ लाख ५ हजाराचा निधी तर रमाई आवास योजनेकरीता १ लाखाचा निधी देण्यात येतो. लाखांदूर तालूक्यातील अनेक लाभार्थ्यांनी २००२ च्या दारीद्र रेषेखालील यादीनुसार यापूर्वी शौचालय बांधणे, घरदुरुस्तीसारख्या योजनांचा लाभ घेतला होता. यातील लाभ क्षेत्रातील लाभार्थ्यांचे लाभाचे दस्ताऐवज पंचायत समिती स्तरावर गहाळ झाले तर काहींची कागदपत्रे हे उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्याचा घरकुल लाभार्थी हा यापूर्वी १० वर्षापूर्वी घरदुरुस्तीचा लाभ घेतल्याने घरकुलाला दुरावला आहे. सन २०१३-१४ च्या घरकुल लाभार्थी यादीमधील अनेक लाभार्थी हे घरकुलापासून रद्दबातल ठरणार आहेत. अशा लाभार्थ्यांची संख्या शंभरपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समितीस्तरावर खंडविकास अधिकारी, सभापती, उपसभापती व अभियंता यांच्याकडे लाभार्थ्यांची पायपीट सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)
जाचक अटीमुळे घरकुलापासून लाभार्थी ठरणार वंचित
By admin | Updated: November 22, 2014 00:10 IST