नागरिकांच्या खिशाला भुर्दंड : वाहकासह प्रवाशांचीही गैरसोयगिरीधर चारमोडे मासळमहाराष्ट्राची लोकवाहिनी असलेली एस.टी. जनतेच्या सेवार्थ सदैव धावते. परंतु याच एस.टी. ने तिकीट दरात वाढ केली की सर्वसामान्यांच्या खिशाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. चार दिवसांवर दिवाळी सण आला आहे. २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर असा राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना विशेष सवलती देण्याऐवजी तिकीट दरात वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांचा चिमटा घेतला आहे.२१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून तर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हा दिवाळी हंगाम असणार आहे. परंतु ही भाडेवाढ २५ आॅक्टोबर ते २७ आॅक्टोबर, ३ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या तारखा वगळून आहे. त्यामुळे बसवाहक तसेच प्रवाशांच्या गैरसोयीची ही बाब ठरत आहे. तिकीट दर वाढवायचेच होते तर सरसकट २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर असे करायला हवे होते. मधल्या काही काही दिवशीच प्रचलित पद्धतीने तिकीट दर ठेवले हे अनाकलनीय आहे. या भाडेवाढीचा फटका प्रत्यक्ष प्रवाशांना बसत असून, नियमित ये जा करणाऱ्या प्रवाशांना याचा अनुभव येत आहे. सकाळी प्रवास करताना जुने किंवा नवीन भाडे तर सायंकाळी प्रवास करताना नवीन किंवा जुनेच भाडे असा विचित्र भाडे आकारणीचा अनुभव या दिवाळीच्या हंगामामध्ये पहायला मिळत आहे. सुधारित टप्पा व दरपत्रकाच्या प्रती तिकीट वितरण शाखेतून प्राप्त करून घ्यावी. इटीआयएम मशीनमध्ये सुधारित दराप्रमाणे, भाडेवाढ पत्रक कार्यान्वित झाले किंवा नाही याची खात्री करण्याच्या सूचना वाहकांना देण्यात आले आहेत. परंतु सुधारित दरवाढीच्या सूचना सर्वसामान्य प्रवाशांना प्रभावीपणे कशा पोहचतील याचे सौजन्य एस.टी.नेच दाखविलेले नाही.२१, २४ आॅक्टोबर व २ नोव्हेंबर, ६ नोव्हेंबरला रात्र मुक्कामी जाताना सर्व वाहकांनी इटीआयएम मशीन मध्ये सर्व नवीन, जुने दरांचे टॅब मारणे व खात्री करून घेणे आवश्यक आहे. कारण आदल्या दिवशी रात्र मुक्कामी जाताना नवीन भाडे तर दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात जुने दराने तिकीट काढणे किंवा याउलट वाहकांना कसरत करावी लागत आहे. जर टॅब बरोबर नसेल तर प्रवाशांना नाहक आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल. या बाबीचा अनुभव २५ आॅक्टोबरला आल्याचे काही प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर परिवर्तनशील भाडे आकारणी, आवडेल तेथे कुठेही प्रवास, मासिक व त्रैमासिक पासेस तसेच विद्यार्थी पासेसला लागू करण्यात आलेली नाही. मात्र ए.सी.सी. कार्डावर देण्यात येणाऱ्या १० टक्के प्रवासी भाडे सवलत ही परिवर्तनशील भाडे आकारणी नुसार राहील. परिवर्तनशील भाडे आकारणीमुळे बरेच प्रवाशी वाहकांशी वाद घालतानाचे चित्र सध्या एस.टी. मध्ये बघायला मिळत आहेत. कारण प्रवासी या भाडेवाढीपासून अनभिज्ञ आहेत.
एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांना मनस्ताप
By admin | Updated: October 26, 2016 00:42 IST