भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयाने उपचारासाठी येणारे रूग्ण किंवा त्यांच्या वाहनधारक नातेवाईकांकडून सायकल स्टँडच्या नावाने बळजबरीने लूट सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हक्काचे शासकीय रूग्णालय आता डोकेदुखी ठरले आहे. मागील काही दिवसापूर्वी रुग्णालय परिसरातून दुचाकींची चोरी होत असल्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने शक्कल शोधून काढली आहे. यासाठी त्यांनी सुशिक्षित बेरोजगार संस्थेला सायकल स्टँडचे कंत्राट दिले आहे. या माध्यमातून एका संस्थेवर येथील दुचाकींच्या सुरक्षेची व रूग्णालयात प्रवेश करणाऱ्यांकडून प्रवेश शुल्क घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. या संस्थेने नेमलेले तरुण रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून प्रवेश शुल्क घेतल्याशिवाय जावू देत नाही. गंभीर स्वरूपाच्या रूग्णांनाही अडवतात. हे कंत्राट खाजगी संस्थेला दिले असले तरी पावती मात्र रुग्णालयाच्या नावाची आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची रूणालयाकडूनच आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकारामुळे रुग्णालयात येणाऱ्या वाहनधारकांमध्ये कमालिचा संताप दिसून येत आहे. खासगी रूग्णालयात महागडा औषधोपचाार करू न शकणाऱ्यांना मोफत उपचार करता यावा, यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्हा सामान्य रूग्णालयाची निर्मिती केली आहे. येथे येणाऱ्या रूग्णाला मोफत औषधोपचार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाचे आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात दरदिवशी शेकडो रूग्ण दाखल होतात. ते येत असताना स्वत:च्या सुविधेसाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने येतात. मात्र प्रवेशदारावर आर्थिक लूट होत आहे. श्रीमंतांना सूट, गरिबांची लूटसामान्य रूग्णालयात सामान्य कुटुंबातीलच रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना सुविधांसह मोफत प्रवेश मिळणे गरजेचे आहे. येथे डॉक्टर, आमदार व खासदारांना मोफत प्रवेश दिला जात आहे. ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे, त्यांची लूट व जे सधन आहेत, त्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. डॉक्टर कर्तव्य बजावण्यासाठी येतात म्हणून त्यांना मोफत प्रवेश समजता येईल. मात्र आमदार व खासदार हे रूग्णालयात उपचारासाठी येत नसताना त्यांना मिळणारी सवलत आश्चर्याचा विषय बनला आहे. (शहर प्रतिनिधी)तीन दिवसात केवळ २० वाहनधारकसदर प्रतिनिधीने जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वत: दोन दिवस फेरफटका मारला असता, प्रवेश करताना पावती देण्यात आली. तीन दिवसानंतर पुन्हा प्रवेश करताना पावती देण्यात आली. या तीन दिवसात केवळ २० वाहनधारकांनी सामान्य रुग्णालयात प्रवेश केल्याचे दिसून आले. मात्र एका दिवशी शेकडो वाहनधारक येत असताना दिलेली पावती बनावट तर नाही ना, असा प्रश्न समोर आला आहे. सदर संस्थेने बनावट पावती बुक छापून त्यातून दररोज शेकडो वाहनधारकांकडून हजारो रूपयांची लूट होत असल्याचे दिसून आले आहे.
वाहनधारकांना शासकीय रूग्णालय ठरु लागले डोकेदुखी
By admin | Updated: April 11, 2015 00:31 IST