भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात आंब्याचा मोहोर पुर्णत: गळाला असून रबी पीक धोक्यात आले आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. आवश्यकता असताना पावसाने दडी मारली होती. यामुळे खरीप पिके धोक्यात आल्याने धानपीके करपली होती. त्यामुळे शेकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून शेतकऱ्यांनी स्वत:ला सावरत रबी पिकांच्या माध्यमातून कर्जाचा बोझा कमी करण्याच्या तयारीत होते. शेतकरी अशा अपेक्षेत असतानाच मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यामुळे शेतात डौलात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. सुमारे तासभर बरसलेल्या पावसामुळे उभ्या पिकांना फटका बसला आहे. यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. याशिवाय बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अकाली पावसामुळे वातावरणात बदल झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने झोडपले; रबी पीक धोक्यात
By admin | Updated: February 12, 2015 00:30 IST