करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील खरीप हंगावर दुष्काळाची गळद छाया पसरलेली दिसत आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने उन्हाचा चटका पऱ्ह्यांना बसला. आतातर फक्त पऱ्ह्यांचा वाळलेला कचराच परखणीत पाहावयास मिळत आहे. धुऱ्यावरील तूर, तिळ व अन्य पिके वाळून तण झाली आहेत. दुबार पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा व धान्य शिल्लक नाहीत, अशी अवघड अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. शासनाच्या मदतीवरच दिवस काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.खरीप हंगाम सन २०१४ मधील पिक निहाय पेरणी झालेल्या क्षेत्रऋाचा अहवाल मोहाडी तालुक्यात १०० टक्के खरीप पिकांची पेरणी व लागवड पूर्ण झालेली आहे. भात नर्सरी रोपे ३२५५.८ हे.आर. क्षेत्रावर लावली गेली आहेत. आवत्या ४० हे.आर. तर रोवणी खालील क्षेत्र ३२५१८ हे.आर. आहे. एकूण भात पिकाखालील क्षेत्र ३२५५८ हे.आर. आहे. खरीप तृणधान्यामध्ये बांध्यावरील तुर १२७७ हे.आर., तीळ १० हे.आर, सोयाबीन ४५.५० हे.आर. क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहेत. भाजीपाला १५, केळी, मसाला व इतर पिकाखालील क्षेत्र ७६ तर खरीप ऊस लागवड क्षेत्र ६७२ हे.आर. आहे. एकूण खरीप पिकाखालील क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्यास ३४८६९ हे.आर. क्षेत्रावर विविध पिकांची लागवड, पेरणी झालेली आहे.सध्या स्थितीचा अंदाज घेतल्यास १०० टक्के पेरणी व लागवड पूर्ण झालेल्या आहेत. मात्र वरूणराजा बळीराजावर रूसून बसला आहे. आशाळभूत नजरेने शेतावर जाणाऱ्या बळीराजाचे डोळे आकाशाकडे वळताच पांढरेच पांढरे ढग दिसल्यास त्याच्या जीवात जीव राहत नाही. शेतीत केलेली मेहनत फळाला येण्यापूर्वीच नष्ट झालेली पाहून डोळे अश्रृंनी भरून पाहत आहेत. शेतीत केलेली मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक दिवस कडक उन्हाने उजाळत आहे. कुठेही पावसाची चिन्हे दिसत नाही. उन्हाच्या कडाक्याने धानाचे पऱ्हे वाळली आहेत. परखनीत तर पऱ्ह्यांच्या वाळलेला तणस दृष्टीस पडतो. बांध्याच्या धुऱ्यावर लावलेली पिके सुद्धा करपून वाळली आहेत. (वार्ताहर)
मोहाडी तालुक्यावर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: July 10, 2014 23:27 IST