कार्यकर्ता मेळावा : पालकमंत्री सावंत यांचे प्रतिपादनलाखांदूर : सर्वसामान्यांच्या कामाला सर्वाधीक महत्त्व देऊन अधिकाऱ्यांकडून ती कामे करवून घ्या, अधिकारी ऐकत नसतील तर शिवसैनिकांच्या पध्दतीने समजावून सांगा. मात्र, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असे प्रतिपादन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी व्यक्त केले.लाखांदूर येथे आयोजित शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख राधेशाम गाढवे, जिल्हा प्रमुख अॅड. वसंता ऐंचिलवार, तालुका शिवसेना प्रमुख अरविंद बनकर, भंडारा तालुका प्रमुख हरिश्चंद्र बांडेबुचे, शहर प्रमुख शेखर अनपल्लीवार, राजेश परशुरामकर, मेघनाथ चौबे, दूर्गाभैया राठोड व शेकडोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत म्हणाले, जनतेना शिवसेनेच्या कामावर व विचारावर तसेच धोरणांवर विश्वास ठेवला. त्यामुळे जनतेचा विश्वास भंग न होता प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाती आलेले काम प्राधान्याने करा. अधिकारी ऐकत नसतील तर शिवसैनिकांच्या भाषेत समजावून सांगा मी आपल्या पाठीशी आहे. गरज पडली तर वरील नेत्यांची मदत घ्या. तसेच पक्ष संघटनेसाठी कामाला लागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. ऐंचिलवार यांनी पक्ष संघटना मजबुतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
By admin | Updated: February 29, 2016 00:22 IST