भंडारा : गत तीन चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली असून पारा ४० अंशापार पोहचला आहे. दुपारी अंगाची लाहीलाही होणारे उन तापत आहे. कुलरची घरघर प्रत्येक घरी सुरु झाली असून उन्हापासून बचावासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसत आहे.
१५ दिवसापूर्वी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने पारा काही अंशाने घसरला होता. मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ व्हायला लागली. दोन दिवसांपासून तर प्रचंड उन तापत आहे. दुपारच्या वेळी चांगलेच चटके जाणवायला लागले आहेत. गत काही वर्षातील तापमानाचा आढावा घेतल्यास यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमान ४० अंशापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. आणखी दोन महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे यंदा प्रचंड तापमान राहण्याची शक्यता आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आता आपल्या घरी कुलर काढले असून शहरातही शीतपेयांची दुकाने गर्दी करुन आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध साहित्यांचाही वापर केला जात आहे.