प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लॉटसह ७५ बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्याला मंजुरी मिळाली असून ऑक्सिजन प्लॉटच्या कामालाही सुरुवात झाली. तालुक्यातील रुग्णांना तेथेच योग्य उपचार होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील येणारा ताण कमी होईल. तसेच लाखांदूर, साकोलीसारख्या दुरच्या भागातून रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील. यापुर्वी लाखांदूर येथे सुविधा नसल्याने १०० किलोमीटरचे अंतर पार करून भंडारा गाठावे लागत होते. परंतु आता लवकरच त्याची गरज राहणार नाही. यासोबतच जिल्हा रुग्णालयात नॉनकोविड ओपीडी करणे सोयीचे होईल. सध्या जिल्हा रुग्णालयातील नॉनकोविड ओपीडी अत्यल्प आहे. जम्बो कोविड केअर सेंटर आणि तालुकास्तरीय सुसज्ज रुग्णालय सुरू झाल्यानंतर ताण कमी होऊन जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळतील, असे त्यांनी सांगितले.
बॉक्स
काळाबाजार करणारे प्रशासनाच्या रडारवर
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारासह रुग्णांकडून अतिरिक्त पैसे उकळणारे खासगी रुग्णालय जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराचा भंडारा शहरात भंडाफोड करण्यात आला आहे. पोलीस प्रत्येक बाबीवर बारीक लक्ष ठेवून असून काळाबाजार करणारे प्रशासनाच्या रडारवर आहेत. तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची रुग्णांकडून माहिती आहे. याबाबत प्रशासन अशा रुग्णालयांची यादी तयार करून त्यांच्यावर निश्चितच कारवाई करेल, असे संदीप कदम यांनी सांगितले.
बॉक्स
लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे
कोरोना संसर्गापासून बचावासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. १८ ते ४४ आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी ठिकठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. संबंधितांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.