भंडारा : जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहीम अंतर्गत नागरिकांना गोळ्यांचे वाटप करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जांब अंतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम कृती कार्यक्रमानुसार देऊळगाव व विटेखारी येथे गोळ्यांचे वाटप करण्यात आले. देऊळगाव येथील एकूण ८८४ लोकसंख्येपैकी ८२३ पात्र लाभार्थी होते. त्यापैकी ७४७ लोकांना प्रत्यक्ष डीईसी, आयव्हरमेक्टीन व अल्बेंडाझोल गोळ्या खाऊ घालण्यात आले. त्यांची टक्केवारी ९१ इतकी आहे.
हा जिल्ह्यातील उच्चांक असून, या गावांत नोडल अधिकारी म्हणून डॉ. सचिन चव्हाण, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक राजेश डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही गावांत एकूण तीन पथकांद्वारे कार्य करण्यात आले. या पथकात आरोग्य सेवक विठ्ठल बारापात्रे, अनिल भोंडे, आरोग्य सेविका आरती सोनवाने, आशा स्वयंसेविका सुलभा ऊके, मंदा म्हात्रे, गीता शेंडे यांनी लाभार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या गोळ्या देऊन त्यांना मार्गदर्शन केले.