काळपट पिवळसर पाणी : शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंतीजवाहरनगर : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील चार दिवसापासुन आठ गावांना दूषित पिवळसर काळपट पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.शहापूर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे स्त्रोत कोरंभी येथील वैनगंगा नदीवर स्थित पंपगृहाद्वारे करण्यात येतो. हे अशुध्द पाणी बेला येथील जलशुध्दीकरण केंद्राद्वारे शुध्द कले जाते. याच ठिकाणाहुन बेला, भोजापूर, उमरी, फुलमोगरा, शहापूर, गोपीवाडा, ठाणा, परसोडी या आठ गावांना सुमारे १२०० नळ जोडणीधारकांना पाणी पुरवठा करण्यात येते. वैनगंगा नदी पात्रातील पाणी हे दिवसेंदिवस पिवळसर काळपट होत आहे. शुध्दीकरण केल्यास हे पाणी शुध्दच होत नाही. याच पाण्याखाली काळी भुकटी जमा होतो. पाण्यास दुरगंधी येणे सुरु झाले आहे. हे पाणी वापरल्यास आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडलेला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागणे सुरु झाले आहे. खासगी सार्वजनिक विहिरी हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलात गेलेली आहे. परिणामी पुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वैनगंगाच्या पाण्यात नाग नदीचे काळपट पाणी मिसळल्याने सर्व नदीचे पाणी दूषित होत आहे. याकडे वरिष्ठ पातळीवर जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या वारंवार भासविणाऱ्या प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)
आठ गावांना दूषित पाणी पुरवठा
By admin | Updated: March 2, 2016 01:23 IST