लाखनी : राज्य शासनाने १२ फेब्रुवारीला नगर पंचायत घोषित केल्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी पदमुक्त झाले आहेत. नगरपंचायत घोषित झाल्यानंतर शासनाने ग्रामपंचायत रद्द करून तहसिलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. परंतु ग्रामपंचायत कार्यालयात नगरपंचायतचे प्रशासक आलेले नसल्यामुळे लाखनीतील अनेक शासकीय व निमशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.लाखनी गावाची लोकसंख्या १५ हजारांवर आहे. येथील नागरिकांच्या विविध समस्या, मागण्या प्रलंबित आहेत. मागील १५ दिवसांपासून गावात होणारी विकास कामे थांबविण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. तसेच नागरिकांना शासकीय कामात लागणारे रहिवासी दाखले, जन्म प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घरटॅक्स पावतीकरीता व इतर दाखत्यांसाठी ग्रामपंचायतीच्या चकरा माराव्या लागतात.तहसिलदारांनी नगरपंचायत कार्यालयात स्वत: उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी माजी ग्रा.पं. सदस्य धनु व्यास यांनी केली आहे. जनतेची कामे ग्रामपंचायत कार्यालयात झाले नाही तर लोकांना तहसील कार्यालयात जाऊन दाखल्यांची मागणी करावी लागेल, असे भास यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रशासकाअभावी कामांचा खोळंबा
By admin | Updated: February 24, 2015 01:41 IST