चिचाळ : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यास विरोध करणारे राज्याचे आदिवासी मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही निषेध सभेत करण्यात आली.१५ जुलै पासून आजमितीला धनगर समाजाचा लढा सुरु असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ३६ व्या क्रमांकावर धनगर जात एस.टी. मध्ये समाविष्ट केली आहे. तो हक्क देण्यास शासन स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्ष करीत असल्याने धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. मात्र पंढरपूर ते बारामती आंदोलनाचे यश पदरी पडणार तर संबंधित मंत्र्यांनी विरोध केल्याने धनगर बांधवाचे आंदोलन तीव्र झाले असून खेडोपाडी व जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन सुरु असून आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. सभेला धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष प्रकाश हातेल, प्रा.शंकर गायकी, शामलाल खऊळ, देवीदास डोकरे, रोषण डोकरे, नानेश्वर ढेंगर, महारु खऊळ, रामलाल खऊळ आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते. संचालन व आभार शामलाल खऊळ यांनी केले. (वार्ताहर)
धनगर समाजाचा निषेध मोर्चा
By admin | Updated: August 2, 2014 23:57 IST