भंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला (वन्यजीव) विस्तारित अभयारण्य घोषित करण्यासाठी पवनी तालुक्यातील खापरी रेहपाडे, परसोडी, जोगीखेडा / हमेशा व चिचगाव या गावांचे भूसंपादन करून मूल्यांकन करण्याकामी उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. प्रस्ताव सादर करताना भूसंपादन मूल्यनिर्धारण करण्यात आलेले नाही, त्यामुळे थेट खरेदी पद्धतीने ग्रामस्थांना मोबदला मिळालेला नाही.
अभयारण्य क्षेत्रातील नागरिक अडचणीत सापडले आहेत. बहुतेक शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवलेली आहे. शासनाने त्वरित शेतीचा मोबदला देऊन गावातील नागरिकांची अडचण दूर करावी. क्षेत्राची मोजणी करण्याचे अधिकार असलेल्या उपअधीक्षक भूमिअभिलेख पवनी कार्यालयाकडे रीतसर मोजणीसाठी प्रस्ताव आलेला नाही, असे अधिकारी नागरिकांना सांगत आहेत. ज्यांनी मोजणी करण्यासाठी प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाकडे द्यायला पाहिजे, त्या वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालयात प्रस्ताव उपलब्ध नाही. त्यामुळे संयुक्त मोजणी अहवाल व कायदेशीर शोध अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विस्तारित अभयारण्य घोषित करणे व शेतकऱ्यांच्या शेतीचा मोबदला देणे, या दोन्ही बाबींना विलंब होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत.