भंडारा : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत भंडारा तालुक्यातील सुमारे ४६४ शिक्षकांचे आॅक्टोंबर महिन्याचे वेतन व चार महिन्यांची एरियसचा २ कोटी २६ लाख १६६ रूपयांचा निधी पंचायत समितीत पडून आहे. वेतन वाटपात हेतुपुरस्सर विलंब होत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तातडीने वेतन वाटप न झाल्यास दि. ८ डिसेंबर रोजी पंचायत समितीला घेराव घालण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी दिला आहे.भंडारा तालुक्यात ४६५ शिक्षक कार्यरत आहेत. यात ३५५ सहायक, ८२ पदविधर, १९ उच्चश्रेणी मुख्यध्यापक, १० केंद्रप्रमुखांचा समावेश आहे. डिसेंबर महिना संपूनही माहे आॅक्टोंबरचे वेतन देण्यात आलेले नाही. भंडारा तालुक्यातील शिक्षकांचे आॅक्टोंबर महिन्याचे वेतन व चार महिन्यांची एरियसचा २ कोटी २६ लाख १६६ रूपयांचा निधी जिल्हा परिषदेने पंचायत समितीला दि.१ डिसेंबर रोजी पाठविलेला आहे. परंतु पंचायत समितीत असलेल्या ढिसाळ कारभारामुळे वेतन वाटपात विलंब होत आहे. त्यामुळे शिक्षकांवर आर्थिक संकट ओढावली आहे. याकडे खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे. वेतनाविषयी पंचायत समितीत माहिती देण्यास टाळाटाळ होते. येथे वेतन देयके बनविण्याचे काम लिपिकाऐवजी एक शिक्षक बनवित आहे. या ठिकाणी वेतन देयकांचे दस्तावेज उपलब्ध नाहीत. मागील वर्षाभरांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे येथील एका लिपिकाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. विशेष चौकशी केल्यास सत्यता उघडकिस येईल. जिल्ह्यातील सहा पंचायत समितीत शिक्षकांचे वेतन झाले असून भंडाऱ्यात का नाहीत, असा प्रश्न उपस्थित होता. त्यामुळे शिक्षकांमध्ये अधिकाऱ्यांविषयी संशय बळावला आहे. याठिकाणी ५ लिपिक, २ अधीक्षक, शिक्षण विभागांची धुरा सांभाळित असले तरी त्यांनाही वेतनाच्या दस्तावेजाविषयी माहिती नाही. याबाबत प्राथमिक शिक्षक संघाने वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी चर्चा केलीे. तातडीने वेतन वाटप न झाल्यास दि. ८ डिसेंबर रोजी पंचायत समितीला घेराव घालण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
निधी असूनही वेतन वाटपात विलंब
By admin | Updated: December 6, 2014 01:00 IST