आठवणींना उजाळा : आंबेडकरी चळवळीचे केले कुशल नेतृत्व देवानंद नंदेश्वर भंडाराबिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे भंडारा जिल्ह्याशी जवळीक ऋणानुबंध होते. त्यांचे जिल्हावासीयांसोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध व आंबेडकर चळवळीसाठी केलेले कार्य जिल्हावासीय कधीही विसरू शकणार नाहीत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दादासाहेबांकडे रिपब्लिकन पक्षाची धुरा आली. ही धुरा त्यांनी समर्थपणे व झुंझारवृत्तीने सांभाळली. लहाणपणापासूनच ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत होते. सन १९६२ पासून भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी शहरवासीयांची इच्छा होती. या कार्यासाठी अनेकांचा विरोध होता. मात्र विरोध झुगारून दादासाहेबांनी जागेसाठी यथोचित प्रयत्न केले. त्यांनी जागेसाठी शासनाकडून परवानगी मागितली आणि अखेर ती परवानगी मिळाली. सन २००२ मध्ये भूमिपूजन तत्कालिन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानी खा. रा.सू. गवई उपस्थित होते. भूमिपूजनानंतर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी त्यांची धावपळ वाखाणण्याजोगी होती. अथक प्रयत्नानंतर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचे थाटात उद्घाटनही करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची दादासाहेबांची तीव्र इच्छा होती. मात्र वृद्धापकाळ व आजारापणामुळे ते या सोहळ्याला उपस्थित झाले नव्हते. याची खंत ते नेहमीच कार्यकर्त्यांकडे व्यक्त करीत. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ‘कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर’ असा नारा दिला होता. त्यावेळी दादासाहेबांनी ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. भूमिहिनांना जमीन मिळण्यात यावी, यासाठी दादासाहेबांनी मोठी चळवळ उभी केली. विदर्भातील संपूर्ण जबाबदारी दादासाहेबांकडे होती. अनेकदा धरणे, मोर्चे, आंदोलन, सत्याग्रह करण्यात आले. यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे होते. हजारो कार्यकर्त्यांसह त्यांना कारागृहात डांबण्यात आले होते. अखेर शासनाने आंदोलनाची दखल घेत भूमिहिनांना जमीन देण्याचा कायदा केला. त्यांना विदर्भ केसरी म्हणूनही ओळखले जाते. १९५४ च्या पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारासाठी ते पायी फिरले. मजुरीची कामे मिळावी, यासाठी त्यांनी रोजगार हमी कायदा ही योजना राबविली. भंडारा शहरानजीक असलेल्या हत्तीडोई दशबल पहाडीच्या सौंदर्यीकरण व पर्यटनस्थळासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक विहारांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. पवनी येथील महासमाधीस्तूप बांधकामासाठी प्रयत्न करून उद्घाटनासाठी ते आवर्जून उपस्थित होते. सामंजस्य, समतोल विचारांचा, अचूक मार्गदर्शन, हळव्या मनाचा, परंतु झुंझार वृत्तीचा संघटक आणि बाबासाहेबांची चळवळ सर्वसामान्यांमध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आंबेडकरी समाज कधीच विसरू शकणार नाही.
दादासाहेबांनी जपले भंडाऱ्याशी ऋणानुबंध
By admin | Updated: July 26, 2015 00:58 IST