लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, शुक्रवारी नव्याने २८५ रुग्णांची भर पडली. अलीकडच्या काळातील हा आकडा सर्वाधिक आहे, तर भंडारा आणि पवनी तालुक्यातील दोन वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला. आता कोरोनाबळींची संख्या ३३४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार १५० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १४ हजार १५२ व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, तर १६६४ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत दहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११८, मोहाडी १७, तुमसर ४७, पवनी ४२, लाखनी ३८, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे २८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६९२० झाली असून, मोहाडी १२०७, तुमसर २०७३, पवनी १६८७, लाखनी १७१८, साकोली १८५७, लाखांदूर ६८८ झाली आहे. आतापर्यंत एक लाख ६९ हजार ६७२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १६ हजार १५० कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी १४ हजार १५२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना मृत्यूदर अत्यल्प आहे. मात्र गत आठ दिवसांत कोरोना मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी भंडारा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला, तर पवनी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घरीच मृत्यू झाला. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६६४
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६६४वर जाऊन पोहोचली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील ७५१, मोहाडी ९६, तुमसर २०९, पवनी ३३४, लाखनी १५७, साकोली १०६, लाखांदूर २१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही होम क्वारंटाइन आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचणी वाढविली असून, ठिकठिकाणी शिबिर घेतले जात आहे. नागरिकांनी ताप, सर्दी, घोकला, अंगदुखी, घशात खवखव अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.