यासोबतच त्रिमूर्ती चौकात कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. मात्र, ही दररोजची समस्या असूनही याकडे लोकप्रतिनिधींची, प्रशासनाची डोळेझाक होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शहराबाहेरून उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र, भंडारा जिल्हा आजही याला अपवाद ठरला आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताप्रमाणे या अपघातांची मालिका थांबवायची असेल तर उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी ओरड आता नागरिकांतून होऊ लागली आहे.
दररोज हजारो वाहने महामार्गावरून धावतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रत्येक जण अतिवेगाने आपले वाहन कसे पुढे काढता येईल यासाठी धडपड करतात. राष्ट्रीय महामार्गावरील ऑफिसर क्लब ते नागपूर नाक्यापर्यंत महामार्गालगत असणाऱ्या साईडपट्ट्या धोकादायक स्थितीत आहेत. याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून याकडे दुर्लक्षच होत आहे. मात्र, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग येत नसल्याने वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हजारो कोटी रुपयांची टोल वसुली होत असतानाही वाहनधारकांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. त्यातच वाढत्या वाहनांमुळे शहरवासियांना त्रास होऊ लागला आहे.
बॉक्l
तहसील कार्यालयासमोर दुभाजक हवा
भंडारा तहसील कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तहसील कार्यालयासमोर दुभाजक हवा आहे. भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या भंडारा तहसील कार्यालयासमोर पेट्रोलपंप, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, भूमिअभिलेख, एलआयसी ऑफिस, मत्स्यव्यवसाय यासह अन्य शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे येथे सतत अनेक नागरिकांची ये-जा असते. महामार्गावरून रस्ता ओलांडताना येथे होणारे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे आता येथे रस्ता दुभाजक तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांची ही आर्त हाक लोकप्रतिनिधींपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. गेल्या काही दिवसांत येथे अनेक अपघात घडले आहेत.
बॉक्स
धुळीतून पुढे जाण्याची दुचाकीधारकांत जणू काही स्पर्धाच
संध्याकाळच्या वेळी सिग्नल पडल्यानंतर वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे अनेक दुचाकीधारक हे धोकादायक साईडपट्टीवरून प्रचंड धुळीचे लोट उडवत एकापुढे एक जाण्याची ही स्पर्धा दररोज पाहायला मिळत आहे. यामुळे त्रिमूर्ती चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. दोन्हीकडून वाहने येत असल्याने येथे थांबणाऱ्या पोलिसांनाही अपघात होण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी यांनाही गंभीर दुखापत झाली होती. अद्यापही ते सावरू शकलेले नाहीत. यामुळे उड्डाणपुलाची गरज आहे.