साकोली : तालुक्यातील मागील काही दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली असून आतापर्यंत या आजारामुळे ११ जण बाधित झाले आहेत. यापैकी १0 जणांवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रक्ताची तपासणी होत नसल्यामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत पैसे देऊन तपासणी करावी लागत आहे. मागच्यावर्षी गडकुंभली येथे अशाच प्रकारची लागण होऊन बहीण-भावाचा मृत्यु झाला होता. तालुक्यातील काही गावात डेंग्यूची लागण झाली असतानाही उपजिल्हा रुग्णालयात सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सध्या या रुग्णालयात ज्ञानेश्वर गणवीर (४0) रा.जांभळी, भुषण बावनकुळे (१३), विकास बावनकुळे (१८) दोन्ही रा.बोंडे, चुन्नीराम मते (१३) रा.गुढरी, जुई गोटेफोडे रा.सासरा, रियाज वासनिक, मैथिली वासनिक, सिमरण मेश्राम (सात महिने) सर्व रा.सासरा अशी रुग्णांची नावे आहेत. यापैकी चितीका बावनकुळे (१0) रा.बोंडे हिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. रुग्णांची दररोज करावी लागणारी रक्ताची सीबिसी चाचणी व डेंग्युची तपासणी किट नसल्यामुळे या रुग्णालयात सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रक्ताची तपासणी बाहेरून करावी लागत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली तालुक्यात डेंग्यू, हिवतापाची साथ
By admin | Updated: May 27, 2014 00:34 IST