अतुल खोब्रागडे ल्ल दाभा(जमनी)भंडारा-वरठी राज्यमार्गाला लागून असलेल्या दाभा जमनी येथे आरोग्य केंद्र नाही,प्रवासी निवारा नाही, पाण्याची समस्या, कोंडवाडा गोडाऊन झाला आहे. तलाठी कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना भाड्याच्या घरात आहे. यासह मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे दाभा जमनी वासीयांचे अच्छे दिन केव्हा येणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.भंडारा शहरापासून सात कि.मी. अंतरावर वरठी रोडवर दाभा जमनी नावाचे गाव आहे. येथे सन १९६० ला ग्रामपंचायतची स्थापना झाली. दाभा येथे ग्रामपंचायत तर जमनी येथे गटग्रामपंचायत आहे. सध्या दाभा जमनी गावामध्ये अनेक समस्या असून लोकप्रतिनिधी व शासनाच्या दुर्लक्षामुळे गावाचा विकास झाला नाही. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. येथे ११ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यालय असून दाभा जमनी गावाची लोकसंख्या २२५८ आहे. या गावात जि.प. हायस्कुलची १ ते ७ पर्यंत शाळा असून दोन अंगणवाड्या आहेत. तसेच जमनी येथे एक मिनी अंगणवाडी असून जि.प. ची १ ते ५ पर्यंतची शाळा आहे. या गावाला लागूनच सुर नदी वाहते. परंतु या गावात अनेक समस्याने घर केले आहे.आरोग्य केंद्र नाही११ सदस्यीय ग्रामपंचायत, गावाची लोकसंख्या २२५८ असून दाभा जमनी गावात आरोग्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. कुठल्याही छोट्या मोठ्या आजारासाठी भंडारा किंवा गावातील खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो.प्रवासी निवारा नाहीदाभा जमनी हा शहरापासून ७ कि.मी. अंतरावर असून तुमसर तिरोडा या राज्य म ार्गावर आहे. परंतु या गावात प्रवासी निवारा नाही. येथील ग्रामपंचायत कार्यालय मुख् य रोडला लागून असून त्याच्याच कडेला प्रवासी थांबतात. प्रवासी निवारा नसल्यामुळे येथे बरेचदा बस थांबत सुद्धा नाही. त्याचा फटका प्रवासी व शालेय विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात बसतो.पाण्याची टंचाईजिथे आड तेथे पाण्याचा रड अशी एक म्हण आहे. या गावाला सूर नदी लाभलेली असली तरी येथे पाण्याची समस्या आहे. गावात ३ बोरवेल ६ विहिरी व जीवन प्राधिकरण योजनेची नळ योजना आहे. परंतु दाभा जमनी येथे ३२५ नळ कनेक्शन असून पाईप लाईन वाढीव नसल्यामुळे लोकांना पुरेसा पाणी मिळत नाही.कोंडवाडा बनला गोडाऊनसर्व गावाप्रमाणे येथे सुद्धा जनावरांसाठी कोंडवाडा असून सध्या या कोंडवाड्यात जनावरे नसल्याने येथील ग्रामपंचायतने कोंडवाड्यात काही ग्रामपंचायतचे किरकोळ साहित्य ठेवले आहेत. जनावरांचा कोंडवाडा ग्रामपंचायतचा गोडाऊन बनला आहे.तलाठी कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना भाड्याच्या घरातयेथे तलाठी कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना असून सध्या या दोन्हीसाठी शासकीय जागा न मिळाल्याने हे दोन्ही कार्यालय भाड्याच्या घरात आहेत. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी शासनाचा दोनदा निधी आणला. परंतु जागा उपलब्ध न झाल्याने इमारत तयार झाली नाही.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षदाभा जमनी हा भंडारा विधानसभा क्षेत्रात असून येथे लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे गावाचा विकास खुंटला असे येथील लोकांनी सांगितले. मागील पंधरा वर्षापूर्वी आमदार निधीतून दाभा जमनी गावासाठी कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यानंतर राज्यमंत्री राहिलेले आमदार यांच्या काळातही कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही. यानंतर तत्कालीन आमदार यांनी या गावात जाऊन समस्या जाणल्या. परंतु त्यांनीही कुठलाही निधी उपलब्ध करून दिला नाही. केवळ खासदार निधीतून राधास्वामी सत्संग भवन ते गावात जाणारा पाच लाखांचा रस्ता मंजूर होऊन त्याचे काम पूर्ण झाले आहे. ज्या गावासाठी पंधरा पंधरा वर्षापासून स्थानिक आमदार कुठलाही निधी उपलब्ध करून देत नसतील तर त्या गावाचा विकास कसा होईल, आता निवडणुकीचे वारे जोमात आहेत. मताचा जागवा मागीतले जाते. परंतु विकासाचे काय, अशी सवाल येथील ग्रा.पं. सदस्य विलास खांदाळे यांनी लोकमतला बोलताना मांडली.
दाभा जमनीवासीय विकासापासून वंचित
By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST