जपान येथे स्पर्धेसाठी निवड : निलज येथील शशीकलाची भरारीयुवराज गोमासे करडी (पालोरा)प्रत्येक विद्यार्थ्यांत निसर्गत: सुप्तगुण असतात. गरज असते ती योग्य वातावरण, प्रशिक्षण व संधीची. करडी जिल्हा परिषद हायस्कुलने ही संधी उपलब्ध करून दिली. अन् निलज खुर्द सारख्या ९०० लोकसंख्येच्या गावातील १६ वर्षीय शशीकला दुर्गाप्रसाद आगाशे या विद्यार्थिनीने भरारी घेतली. करडी महाविद्यालयाची ती ११ वीची विद्यार्थिनी आहे. आतापर्यंत तिने राज्य व राष्ट्रीयस्तरावर सायकलींग क्रीडाप्रकारात ३ सुवर्ण, ४ रजत व ४ ब्रांझ पदकाची झळझळीत कामगिरी केली. जानेवारी २०१६ जपान येथील स्पर्धेसाठी शशीकलाची निवड झाली असून तिच्या यशामुळे शाळा, गाव, व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथील दुर्गाप्रसाद आगाशे हे शेतीसह घरे बांधण्याचे कंत्राट घेतात. कुटुंबात आईवडील व पाच बहिणी असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले. मुलींनी क्रीडा प्रकारात नाव कमवावे ही वडीलांची इच्छा होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण सुरु असतानाच तिला तुमसर, साकोली राज्यमार्गावर रनिंग स्पर्धेचे धडे दिले. धावण्यातील वेगामुळे एक दिवस नाव कमावणार, असे सर्वांना वाटायचे. हायस्कुलच्या शिक्षणासाठी तिने करडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला. क्रीडा प्रशिक्षक बी.एस. टेंभरे यांनी तिच्यातील गुण ओळखून प्रशिक्षीत केले. सोबतच राष्ट्रीयस्तरावर तलवारबाजीत कामगिरी करणाऱ्या निशीकांत इलमे यांचेही तिला मार्गदर्शन लाभत होते. करडी शाळेतून तिने भंडारा, वरठी व पुणे येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धात भाग घेतला. योग्य वातावरण, प्रशिक्षणामुळे तिने सर्व स्पर्धात प्रथम स्थान पटकविले. ढोरवाडा येथील क्रीडा प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांच्या मार्गदर्शनात तुडका मैदानावर तिचा दररोज सराव व्हायचा. आठवीमध्ये असताना क्रीडा प्रबोधीनी पुणे येथे तिची निवड झाली. गुणात्मक हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम येथेच झाले. प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनात सायकलींग या क्रीडा प्रकारात राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये संधी मिळाली.राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धातील कामगिरीसन २०१३-१४ मध्ये झालेल्या खारघर येथील राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेत तिला दोन ब्रांझ पदके मिळाली. अमरावती येथे याच कालावधीत दोनदा खोळली. स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. सन २०१४-१५ पुसद शहरातील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. राष्ट्रीय स्तरावर ती रांची (झारखंड) केरळ, कर्नाटक व हरियाणा राज्यात खेळली. सन २०१५ मध्ये रांची येथे सुवर्ण कामगिरी केली. कर्नाटकात रजत पदक मिळाले. केरळ मध्ये तीन रजत व दोन ब्रांझ पदकाची चमकदार कामगिरी केली.जपान दौऱ्यासाठी निवडराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण कामगिरीमुळे जानेवारी २०१६ मध्ये जपान देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलींग स्पर्धेसाठी शशीकलाची निवड झाली आहे. सायकलींग क्रीेडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी ती विदर्भाची एकमेव खेळाडू ठरली आहे. सन २०२० मध्ये होणाऱ्या आॅलंपिकच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे शशीकलाने सांगितले.
सायकलपटूने रोवला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
By admin | Updated: August 18, 2015 00:41 IST