साकोली : ग्रामपंचायत कार्यालय साकोली अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला मागील दोन वर्षापासून पुरस्कार वाटपाचा मुहूर्त मिळत नसल्याने ही पुरस्काराची रक्कम तशीच पडली आहे. पुरस्काराची तारीख निश्चित झाली नसली तरी या निधीतून खर्च करणे सुरू झाले आहे. त्यामुळे हा निधी नियमानुसार खर्च होणार की नाही अशी चर्चा साकोलीत सुरू आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती साकोली अंतर्गत सन २०११-१२ या वर्षात शासनाच्या निकषाप्रमाणे या समितीने तंट्याचे निपटारा केल्याबद्दल साकोलीला १० लाख रुपयाचे पुरस्कार मिळाला. हा निधी मिळून जवळपास दीड वर्ष झाला. मात्र या निधीतून पुरस्कार वाटप अजूनपर्यंत झाली नाही. याच पुरस्काराबरोबर तालुक्यातील तीन इतर गावांना मिळालेला पुरस्कार वितरण करण्यात आले हे येथे उल्लेखनीय. मात्र साकोलीत हा निधी का वाटण्यात आला नाही हा चर्चेचा विषय असून साकोलीच्या तंटामुक्त समितीलाच न्यायाची प्रतिक्षा असल्याचे दिसून येते. जानेवारी महिन्यात या समितीतर्फे पुरस्कार वाटपाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र माशी कुठे शिंकली हे कळण्याआधीच हा पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला. यावरुन या समितीच्या अध्यक्ष, सदस्यात किती एकता आहे हे दिसून येते. दर दोन महिन्याला पुरस्कार वाटपाची जाग समितीला येते. या संदर्भात बैठकाही बोलविल्या जातात. यात कधी सदस्य तर कधी कुणी गैरहजर राहतात. तर कुणी सदस्य आपल्या मर्जीप्रमाणेच खर्च करण्याचा हट्ट धरुन अंदाजपत्रक तयार करुन आणतात. याच मतभेदावरुन हे पुरस्कार वाटप रखडले आहे. आताही या पुरस्काराची तारीेख निश्चित झाली नाही. तरी ग्रामपंचायततर्फे सिमेंट खुर्च्या व इतर साहित्य खरेदी करण्यात आले. यावर ५० ते ६० हजार रुपयेही खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.आज समितीचे अध्यक्ष रामू लांजेवार, सरपंच हेमलता परसगडडे, सदस्य हेमंत भारद्वाज, ललीत खराबे, पुरुषोत्तम कोटांगले यांच्या उपस्थितीत गणेश वॉर्डात बोरवेल याच निधीतून खोदण्यात आली. हे सर्व नियमाप्रमाणे असले तरी आधी पुरस्काराची तारीख निश्चित करा अशाही प्रतिक्रिया सदस्यांकडून येत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
संस्कृ ती जागवणार विठू माऊली तू...!
By admin | Updated: July 6, 2014 23:47 IST