कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बारा बलुतेदारातील लोहार, चांभार, धोबी, न्हावी, सुतार, कुंभार, सोनार, गवळी, गुरव, चांभार, बेलदार, मातंग यांच्यावर रोजगाराचे मोठे संकट उभे झाले आहे. अठरा अलुतेदार असलेले कासार, गोंधळी, कोरव, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, जोशी, भाट, जंगम, शिंपी, सनगर, साळी, वाजंत्री आणि मुस्लीम समाजातील बारा बलुतेदार आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर आणि घोड्याची नाल बनविणारे शिकलगार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी या बलुतेदार व अलुतेदारांकडे वतने होती. आता ती नष्ट झाल्याने काम केल्याशिवाय यांच्या घरी चुली पेटत नाहीत. यातही अनेकजण भटके जीवन जगतात तर काही जातीचे लोक रस्त्याच्या कडेला आपली दुकाने मांडून कामे करीत आहेत. औद्योगिक प्रगती झाल्याने अनेकांचे कामधंदे बंद पडले. सध्या ह्या सर्व जाती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय जातीत त्यांचा समावेश आहे. सद्यपरिस्थितीत बलुतेदारांचे धंदे बंद पडले आहेत. मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्येदेखील यांना मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. परंतु सरकारने एक रुपयाही मदत केली नाही. यावेळीदेखील १५ एप्रिलला संचारबंदी लागू केल्याने अनेकांची रोजीरोटी बुडाली आहे. बलुतेदारमधील अनेक जातीची गंभीर परिस्थिती आहे. लोहार, चांभार, न्हावी, धोबी, कुंभार ,मातंग समाजाची सध्या पूर्ण धंदे बंद पडल्याने उपासमार सुरू झाली आहे. १८ अलुतेदार असलेल्या व भटके जीवन जगणारे गोंधळी, गोसावी, भाट, वाजंत्री, भोई (धिवर) यांचीदेखील जगणे मुश्किल झाले आहे. तसेच मुस्लीम समाजातील शिकलगार, छप्परबंद, पिंजारी, फकीर, मदारी यांची अवस्थाही बिकट झाली आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकारने अनेक व्यावसायिकांना संचारबंदीच्या काळात मदतीचा हात दिला तसाच बलुतेदार व अलुतेदारांनाही आर्थिक मदतीची मागणी जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावने व बेलदार संघटनेचे राजेश यलशेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.
संचारबंदीमुळे शेतीपूरक ग्रामीण व्यावसायिकांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST