भंडारा : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यामुळे नातेवाईकांची व रुग्णांची उडणारी तारांबळ लक्षात घेता त्यांना मदत व्हावी, या दृष्टिकोनातून खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कोरोना मदत केंद्राचा शुभारंभ आज करण्यात आला. नातेवाईकांसाठी रुग्णालय परिसरात पाणपोई सुरू करण्यात आली.
कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बरेचदा वेळेत योग्य माहिती मिळत नसल्याने ताटकळत बसावे लागते. गोंधळलेल्या मानसिकतेत असणाऱ्या रुग्णांना विविध मदत मिळणे सोयीचे व्हावे, यासाठी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून रुग्णालय परिसरात कोरोना मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज याची सुरुवात केली गेली.
जिल्ह्यात खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कोरोनासाठीच्या खाटांची संख्या, आरोग्य यंत्रणेतील व्यवस्थेची माहिती या मदत केंद्रातून नातेवाईकांना दिली जाणार आहे. आवश्यक असलेले अन्य मार्गदर्शनही या केंद्रातून दिले जाणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत केंद्र सुरू राहणार असून, रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारची मदत लागत असल्यास मदत केंद्राशी संपर्क साधून अडचण सोडवून घ्यावी, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सार्वजनिक पाणपोई सुरू करण्यात आली.
यावेळी माजी आमदार चरण वाघमारे, उल्हास फडके, मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, विनोद बांते, विकास मदनकर, मयूर बिसेन, चैतन्य उमाळकर, संजय एकापुरे, कैलाश तांडेकर, बंटी मिश्रा, मनोज बोरकर, अजीज शेख, अनुप ढोके, रोशन काटेखाये यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.