जिल्ह्यात सद्यस्थितीत २१ हजार ५०० च्या वर कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या ५ हजार ३४३ रुग्ण उपचार घेत आहेत. अशा स्थितीत भंडारा पालिका हद्दीतही रुग्ण संख्या गतीने वाढत आहेत. भंडारा शहर हॉटस्पॉट ठरला आहे. या सर्व बाबींवर उपाययोजना करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाला लक्षावधी रुपयांची गरज आहे. गत सव्वा वर्षात पालिकेला जिल्हा प्रशासनाने चौदाव्या वित्त योजनेअंतर्गत २७ लक्ष ९१ हजार रुपये दिले आहे. याशिवाय आता पालिकेने पुढील कामासाठी २५ लक्ष रुपये एवढी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
बॉक्स
निधीची गरज
जनजागृती यांसह विविध उपाययोजना करण्यासाठी भंडारा नगरपरिषद प्रशासनाला लक्षावधी रुपयांची गरज आहे. मात्र वेळेवर निधी मिळाल्यास प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करता येऊ शकते. आता पुढील नियोजनासाठी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे २५ लाखांची मागणी केल्याचे समजते. निधीची अडचण जाता कामा नये असा सूरही या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे.
बॉक्स
कोविड केअर सेंटर वाढवायचे काय
आवश्यकतेनुसार जिल्ह्यात कोविड केअर सेंटर वाढविता येऊ शकतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र सद्यस्थितीत येत्या तीन ते चार दिवसात १४० खाटांची अतिरिक्त सुविधा जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच भंडारा शहरातही सहा कोविड केअर सेंटर आहेत. आवश्यकता भासल्यास नवीन केअर सेंटर बाबतही विचार केला जाऊ शकतो.
बॉक्स
मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागल्यानंतर भंडारा नगरपालिकेने कोरोना प्रतिबंधक उपाय योजने अंतर्गत विविध कठोर पावले उचलली आहेत. सध्या भंडारा शहर हॉटस्पॉट ठरत आहे. यावर आळा घालण्यासाठी आमचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. जनजागृतीसह अन्य कामासाठी कोविड अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडे २५ लक्ष रुपयांची मागणी आम्ही केली आहे.
विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगर परिषद भंडारा