प्रकरण कर्मचाऱ्याला मारहाणीचे : कामबंद आंदोलन सुरुच, आज मोर्च्याचे आयोजनभंडारा : माजी नगराध्यक्ष भगवान बावणकर यांनी आरोग्य विभागातील लिपीक किशोर उपरीकर यांना शुक्रवारी मारहाण केली होती. याप्रकरणी उपरीकर यांच्या तक्रारीवरुन बावणकर यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बावणकर व अतिक्रमण पाडण्याचा मुद्दयातून महिलेच्या तक्रारीवरुन किशोर उपरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाण प्रकरणात बावणकर यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान उद्या सोमवारी (२४) कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भगवान बावनकर यांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशाराही नगरपरिषद कास्टट्राईब संघटनेने केली आहे. या आशयाचा दुजोरा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश मोगरे यांनी दिला. शुक्रवारी उपरीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भंडारा पोलिसांनी बावनकर यांच्या विरुध्द ३५३, ५०४, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच भगवान बावनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किशोर उपरीकर यांच्या विरुध्द भादंविच्या ३४१, २९४, ५०४, ५०६ व तसेच महिलेच्या तक्रारीवरुन ३५४ व ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडीत जनसामान्यांची कामे रखडली आहे. (प्रतिनिधी)
माजी नगराध्यक्षांसह परस्परांविरुध्द गुन्हे दाखल
By admin | Updated: August 24, 2015 00:43 IST