भंडारा : जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागांत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत एका कर्मचाऱ्याने सहा महिन्यांपासून वेतन रखडल्याने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.राहूल मोरेश्वर डुंभरे (३६) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा क्षयरोग अधिकारी क्षयरोग केंद्रातील लाखांदूर पथकात राहूल डुंभरे हे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मागील सहा महिन्यापासून त्याचे वेतन व अन्य भत्ते आरोग्य विभागाने दिले नाही. त्यामुळे थकित वेतन मिळावे यासाठी राहूल डुंभरे याने आरोग्य विभागात अनेकदा पायपीट केली. मात्र त्याचे वेतन व टी.ए.डी.ए. मिळाले नाही. अशात त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. वेतन रखडल्याने त्याच्यावर आर्थिक संकट ओढविले. पैशाच्या विवंचनेत त्याने १२ मार्चला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून नदीत उडी मारून जीवनयात्रा संपविली. त्यांचा शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कारधा परिसरात मृतदेह मिळाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील असा आप्त परिवार आहे. महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात कंत्राटी काम करणाऱ्या राहूलला वेतन न मिळाल्याने आत्महत्या करावी लागण्याचा प्रसंग ओढवला. या घटनेचा संघटनेच्या अनिल पारधी, पवन वासनिक, भोगेंद्र बोपचे, राजू करंडे यांनी क्षयरोग अधिकारी डॉ. वाय.बी. कांबळे यांची भेट घेवून मृतकाच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली.राज्यात सुमारे दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे मागील सहा महिन्यापासून वेतन प्रलंबित असून दीड ते दोन वर्षांचे भत्ते देण्यात आले नसल्याने या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. (शहर प्रतिनिधी)
वेतनाअभावी कंत्राटी कामगाराची आत्महत्या
By admin | Updated: March 15, 2015 00:51 IST