वीज बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:11+5:30

राज्यात २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. वीज वितरण कंपनीने या काळात रिडींग घेतले नाही. एप्रिल आणि मे महिन्यांचे सरासरी बील पाठविले. तर काहींना बीलच प्राप्त झाले नाही. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांच्या हाती भरमसाठ रक्कमेचे बील पाहून अनेकांना घाम फुटला आहे. तर काहींचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. साधारणत: महिन्याला ५० ते ६० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना लॉकडाऊनपूर्वी दरमहा ५५० ते ६०० रुपये बील येत होते.

Consumers' eyes turn white with electricity bills | वीज बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे

वीज बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे

Next
ठळक मुद्देअव्वाच्या सव्वा बिल : बिल भरल्यास महिनाभर घर चालवायचे कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात सरासरी वीज बील पाठविणाऱ्या वीज वितरणने आता ग्राहकांना पाठविलेले बील पाहून डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. महिन्याला साधारणत: ५०० ते ७०० रुपये बील येणाऱ्यांच्या हातात तीन महिन्याचे थेट तीन ते साडेतीन हजाराचे बिल पडले आहेत. वीज बिल भरल्यास महिन्याभर घर चालवायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वीज वितरणकडे याबाबत विचारणा केली तर नियमाप्रमाणे वीज बिल बरोबर असल्याचे सांगत ‘गणित’ही करुन दाखवित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहक आता मोठ्या अडचणीत सापडले.
राज्यात २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. वीज वितरण कंपनीने या काळात रिडींग घेतले नाही. एप्रिल आणि मे महिन्यांचे सरासरी बील पाठविले. तर काहींना बीलच प्राप्त झाले नाही. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांच्या हाती भरमसाठ रक्कमेचे बील पाहून अनेकांना घाम फुटला आहे. तर काहींचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. साधारणत: महिन्याला ५० ते ६० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना लॉकडाऊनपूर्वी दरमहा ५५० ते ६०० रुपये बील येत होते. मात्र आता हेच बील ग्राहकांना तीन ते साडेतीन हजार रुपये आले आहे. १५०० ते १६०० बील येणाऱ्या ग्राहकाला दुप्पट बील आले आहे. अनेक ग्राहकांना तर तीप्पट व चौपट बील आले आहे. सरासरी आलेल्या बीलाची रक्कम भरली असली तरी ती रक्कम या वीज बिलातून कमी करण्यात आली नाही, अशा अनेक तक्रारी आहेत.
दुसरीकडे वीज वितरण कंपनीने विद्युत बिल एकंदरीत कुठल्या आधारावर पाठविले याबाबत माहिती देणारे अ‍ॅपच सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपवर ग्राहक क्रमांक घातल्यावर मीटर रिडींगसह देयकाची पुर्ण माहिती येते. मात्र यातील किंबहुना माहिती ग्राहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आता वीज बिल भरावे की, घर चालवावे अशा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.

विदर्भ राज्य समिती : सर्व ग्राहकांचे वीज बिल माफ करा
लॉकडाऊन काळात ग्रामीण व नागरी भागात गरीब व सामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले. हाताला काम नसल्याने मजुरीविना अनेक कुटूंबाचे हाल झाले. लॉकडाऊन शिथिल होवून काही दिवस लोटले असतानाच वीज वितरण कंपनीने अवाजवी बिल पाठविले. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान गरीब गरजू व सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्यासाठी शासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा अन्यथा विदर्भ राज्य समितीने आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लाखांदूर तालुक्यात चार उपकेंद्राअंतर्गत २५ हजार पेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. त्यात ४०० उद्योजक व सात हजार कृषी पंपधारकांचा समावेश आहे. अवाजवी वीज बिलाने संबंध ग्राहकांमध्ये धडकी भरली आहे.
देयकांच्या संदेशाने वाढतोय मनस्ताप
कोरोना पार्श्वभूमीवर ग्राहकांना दुप्पट, तिप्पट वीज देयक पाठविले जात आहे. काही ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरुनही सावकारी पध्दतीने ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविणे सुरु केले आहे. परिणामी ग्राहकांचा मनस्ताप वाढला असून संताप व्यक्त होत आहे. घरगुती युनीटमागे सरासरीच बील पाठविल्याने देयकाच आकडा फुगला आहे. तीन महिन्याचे युनीट एकत्र करुन ११.७१ रुपये या प्रती युनिट दराने बील पाठविण्यात आले आहे. तसेच मीटर भाडे सुध्दा १० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. स्थिर आकार, वहन आकार व वीज शुल्क ही १६ टक्के व व्याज आकारणी कंपनीकडून केली आहे. काही ठिकाणी ग्राहकांनी टप्याटप्याने वीज बील भरण्याची मागणीही केली आहे.

लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना मिळालेल्या घरगुती वीजेचे बिल माफ होईपर्यंत नागरिकांनी आर्थिक असहयोग आंदोलन केले पाहिजे. वीज बिल वसुली व पुरवठा खंडित करणाऱ्यांचा मज्जाव करावा, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
- राम येवले,
संयोजक, विदर्भ राज्य समिती

Web Title: Consumers' eyes turn white with electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज